आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यात लॉटरी तिकीटाच्या नावाने एक घोटाळा समोर आला आहे. येथे एक लॉटरी तिकीट विक्रेता ४० कोटी रुपये घेऊन फरार झाला आहे. जिल्ह्यातील पोलावरम मंडल येथील मुरमल्ला गावातील चिंतलापुडी वीरा शंकर राव यांनी ३० वर्षांपूर्वी लॉटरी तिकीटांचा हा धंदा सुरु केला होता. हळू-हळू त्याने व्यापारी आणि प्रसिद्ध व्यक्तींशी संधान बांधले होते.
त्यानंतर चिंतलापुडी वीरा शंकर राव याने पाच लाख ते एक कोटी रुपयांचे लॉटरी तिकीट विकू लागला. त्याने आजूबाजूच्या लोकांशी मैत्री केली आणि लॉटरीची तिकीटे विकली. अनेक वर्षे धंदा करीत असल्याने अनेक लोकांनी वीरा शंकर राववर विश्वास ठेवून त्याच्याकडील लॉटरीची तिकीटे खरेदी केली. परंतू त्याने लोकांचे पैसे दिले नाहीत. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला तो आपली मुले आणि बायकोसह पसार झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला
जेव्हा पीडीत पैसे घेण्यासाठी घरी आले तेव्हा त्याच्या घराला टाळा होता.एक आठवड्यानंतरही तो न आल्याने आपल्या फसवल्याचे लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर लोकांनी मुम्मीदिवरम येथील आमदार दातला बुचीबाबू आणि पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. लोकांनी तक्रार केली आहे की त्याचा फोन देखील बंद आहे. यातील पीडीत हे मजूर असून काही उद्योगात काम करणारे छोटे व्यापारी आहे.सर्वांनी आपल्याला फसवल्याची फिर्याद पोलिसांसमोर मांडली आहे.
सर्वजण सांगत आहेत की काही महिन्यांपासून शंकर राव पैसे देण्याचा दावा करत होता. परंतू आता तो संपूर्ण कुटुंबासह पसार झाल्याने हे लोक हवालदील झाले आहेत. अनेकांनी मजूरी करुन हे पैसे साठवले होते आणि लॉटरीची तिकीटे विकत घेतली होती. आता वीरा शंकर राव पैसे न देता पळाला आहे. पीडीतांनी आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.