मेहुणबारे (ता. चाळीसगाव): एखाद्या व्यक्तीला चुकीच्या पद्धतीने बंदिस्त केले जात असेल, तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १०० नुसार प्रांताधिकाऱ्यांना ‘शोध वॉरंट’ जारी करण्याचे अधिकार असतात. याच अधिकाराचा वापर करून येथील प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्यामुळे चाळीसगाव तालुक्यातून अपहरण करून नेलेल्या १६ वर्षीय मुलाची सुटका झाली आहे. या सुधारित कायद्याचा राज्यात पहिल्यांदाच वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
टाकळी प्र. चा. (ता. चाळीसगाव) येथील शेतमजूर शोभाबाई कोळी यांना वैधव्य प्राप्त असून, त्या १६ वर्षीय मयूर या मुलाबरोबर वास्तव्यास आहेत. त्या ऊसतोडणीसाठी जात असतात. ता. १ सप्टेंबरला सकाळी त्यांच्या घरी मुकादम परभत गायकवाड (रा. हिसवाळ, ता. मालेगाव) व दीपक भगत (रा. बारामती, जि. पुणे) आले. दोघांनी शोभाबाईंना त्यांचा मुलगा मयूर याला कामाला घेऊन जायचे आहे, असे सांगून आपल्या चारचाकी वाहनात बसविले.
दुपार होऊनही मुलगा घरी न आल्याने शोभाबाईंनी मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल बंद येत होता. सायंकाळ होऊनही मुलगा घरी न आल्याने शोभाबाई चिंताग्रस्त झाल्या. सायंकाळी पाचला परभत गायकवाड व दीपक भगत यांनी फोन करून सांगितले, की आम्ही तुझ्या मुलाला बारामती येथे घेऊन आलो आहोत, तुला तुझा मुलगा परत पाहिजे असेल, तर आम्हाला चार लाख रुपये आणून दे, नाही तर आम्ही तुझ्या मुलाला कर्नाटकमध्ये विकू वा त्याचे हात-पाय तोडून टाकू’ अशी धमकी दिली.
पोलिसांत धाव
आपल्या मुलाबाबत आलेल्या फोनमुळे शोभाबाई प्रचंड घाबरल्या. त्याच्या जिवाचे बरे-वाईट होईल, या भीतीने त्यांनी सुरुवातीला नातेवाइकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या मदतीने त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. दोन दिवस होऊनही कुठलीच कार्यवाही झाली नाही. पोलिस दखल घेत नसल्याने त्यांना कोणी तरी वकिलांचा सल्ला घेण्याचे सांगितले.
मयूरला केली मारहाण
मयूर घरी आल्यावर त्याने आप बिती कथन केली. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता, त्याला अमली पदार्थ व दारू जबरदस्तीने पाजून मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
मुलाला बिलाखेडला सोडले
आपल्याविरोधात मुलाच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्याचे अपहरणकर्त्यांना समजताच त्यांनी मयूरला बारामती येथून अपहरण करणाऱ्यांचे सहकारी परशुराम गायकवाड व संजय सोनवणे (रा. कोपरगाव) बिलाखेड (ता. चाळीसगाव) येथे घेऊन आले. त्यांनी शोभाबाईंना तसे कळविल्यावर त्या नातेवाइकांसह आल्या. मयूरला तेथेच सोडून ते पसार होणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई हवालदार प्रशांत पाटील, सुनील खैरनार, दत्तू साळवे, अशोक मोरे यांनी केली. मुख्य संशयित परभत गायकवाड व दीपक भगत फरारी झाले आहेत.
प्रांताधिकाऱ्यांची तत्परता
शोभाबाईंनी ॲड. प्रेम निकम व रिंकेश गंगेले यांच्याशी संपर्क साधला. दोन्ही वकिलांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा २०२३ च्या कलम-१०० अन्वये चाळीसगावचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे संशयितांविरुद्ध ‘सर्च वॉरंट’चा अर्ज दाखल केला. प्रांताधिकारी हिले यांनी तत्काळ दखल घेत संशयितांविरुद्ध ‘सर्च वॉरंट’चा आदेश पारित केला. चाळीसगाव पोलिसांना अपहरण करणाऱ्यांचा शोध घेऊन अल्पवयीन मुलाची सुटका करावी, असे आदेश दिले. त्यावरून पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी तत्काळ शोधमोहीम राबविली.
गर्ल्स हॉस्टेलच्या आड देवविक्री! व्हॉट्सअॅपवर सौदा अन्... ; पोलिसांनी छापा मारताच, समोर आलं भयानक सत्यभारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम-१०० नुसार मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून ‘अटक वॉरंट’ काढले. यामुळे पोलिसांनी कारवाई केली. शोभाबाईंना त्यांचा मुलगा परत मिळाला, याचे समाधान आहे. बहुधा राज्यातील ही पहिलीच अशी कारवाई असू शकते.
- प्रमोद हिले, प्रांताधिकारी, चाळीसगाव