गुणरत्न सदावर्तेंकडून आता थेट भाजपच्या या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी, प्रचंड संतापले
Tv9 Marathi September 09, 2025 12:45 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत, सर्वात महत्त्वाची आणि मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करणं ही मागणी देखील मान्य झाली आहे. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर काढण्यात आला. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?  

सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  जोपर्यंत सर्व ओबीसी नेते एकतेने नांदत नाहीत, तोपर्यत जरांगे यांच्यासारखे पपेट गप्प बसणार नाहीत,  तुमची वज्रमूठ तयार करा. शासनाच्या जीआर बद्दल बोलतात. हैदराबाद गॅझेट या आधारावर ठरतं का?  या संविधानिक, तात्विक बाबीवर चालणाऱ्या गोष्टी आहेत, असं यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मनोज जरांगे यांचं आंदोलन पपेट सारखं असतं, त्यांची स्क्रिप्ट तयार असते. या आंदोलनाबाबत शासनाने काही तरी करावं, जरांगे पाटील यांना संविधानाचा अभ्यास नाही.  जातीवर आधारित काम करायचं आहे का? जरांगे यांनी जातीवाद वाढवला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर ते खालच्या भाषेत बोलले आहेत. राधा कृष्ण विखे पाटील जजमेंटच्या आधारे आपण देखील राजीनामा द्यावा. मंत्री सुद्धा  पब्लिक सर्व्हंट आहेत . विखे यांच्याकडे दोन पदं आहेत. मी या सर्व गोष्टींना न्यायीक दृष्टीकोनातून बघत आहे, त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी स्वत: राजीनामा द्यावा, असं यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.  दरम्यान सदावर्ते यांनी पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.