खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी
महाड तालुक्यात भातपिकांची समाधानकारक स्थिती
महाड, ता. ८ (बातमीदार) : तालुक्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण यंदा सरासरीपेक्षा कमी असले, तरी संततधार सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महाड तालुक्यामध्ये सुमारे नऊ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात आलेली आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असले तरी भातपिकाची स्थिती समाधानकारक आहे. बारसगाव-वरंध मार्गालगतच्या काही भातशेतीवर निळी भुंगेर रोगाचा किरकोळ प्रादुर्भाव दिसून आला होता, मात्र कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून फवारणी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
-------------------------------------------------
पंचनामे सुरू
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कुंभे शिवथर, वीर, दासगाव, पाने, रुपवली गावांमध्ये २.३१ हेक्टर भातशेती, दोन आंबा कलमांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून भातशेतीसाठी प्रति हेक्टर आठ हजार ५०० रुपये, तर एका हेक्टरमधील शंभर आंब्यासाठी २२ हजार ५०० रुपये अशी नुकसानभरपाई देण्याचा सरकारी नियम असून, त्या दृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.
----------------------------------------
सध्या भातपिकावर फुलांचे फुटवे येण्याचा टप्पा सुरू असून, पावसामुळे जमिनीमध्ये आवश्यक तेवढा पाण्याचा थर उपलब्ध असल्याने पिकांची वाढ समाधानकारक आहे. कृषी विभागाच्या सूचनांचे पालन झाल्यास खरीप हंगामात अधिक उत्पादन मिळेल.
- धीरज तोरणे, तालुका कृषी अधिकारी
........