Bullet Train: बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा नवा टप्पा सुरू! ४० मीटर लांबीचा पहिला बॉक्स गर्डर लॉन्च
esakal September 09, 2025 04:45 PM

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्राच्या हद्दीत महत्त्वाची कामगिरी पूर्ण करण्यात आली आहे. नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) शनिवारी (ता. ६) पालघर जिल्ह्यातील सखारे गावाजवळ फुल स्पॅन लॉन्चिंग गॅण्ट्रीच्या सहाय्याने ४० मीटर लांबीचा पहिला फुल स्पॅन प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट बॉक्स गर्डर यशस्वीरीत्या लॉन्च केला. यामुळे राज्यात कॉरिडॉरच्या नवा टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

बुलेट ट्रेन कॉरिडॉरचा महाराष्ट्रातील टप्पा १५६ किलोमीटर लांबीचा आहे. यामधील १३५ किलोमीटर उंच मार्गिकेवर (एलिव्हेटेड कॉरिडॉर) २,५७५ फुल स्पॅन गर्डर बसवले जाणार आहेत. प्रत्येक गर्डर ४० मीटर लांब आणि ९७० मेट्रिक टन वजनाचा आहे. एकसंध पद्धतीने तयार होणाऱ्या या गर्डरसाठी तब्बल ३९० घनमीटर काँक्रीट आणि ४२ मेट्रिक टन स्टील लागते.

Mumbai News: एकदम Cool प्रवास! मुंबई लोकलचं रुपडं पलटणार, वंदे मेट्रो स्टाइल डब्बे धावणार; पाहा गाडीचे वैशिष्ट्ये

या तंत्रज्ञानाचा वापर करून काम १० पट जलद गतीने करता येते. गुजरातमधील ३१९ किलोमीटर वायाडक्ट पूर्ण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही या पद्धतीने पूल आणि वायाडक्टचे काम सुरू झाले आहे. शिळफाटा ते गुजरात सीमेपर्यंत एकूण १३ कास्टिंग यार्ड उभारले जात असून, त्यापैकी पाच यार्ड सध्या कार्यरत आहेत.

महाराष्ट्रातील प्रगती (५ सप्टेंबर २०२५ पर्यंत)
  • ठाणे, विरार आणि बोईसर स्थानकांवर जलद गतीने काम सुरू असून, विरार व बोईसर येथे पहिले स्लॅब कास्ट झाले आहे.

  • मार्गिकेवरील पायाभरणी व पिलर बांधकाम प्रगतीत; आतापर्यंत ४८ किमी पिलर तयार.

  • पालघर जिल्ह्यातील दहानू येथे फुल स्पॅन बॉक्स गर्डर लॉन्चिंगसह पूल उभारणीला प्रारंभ.

  • सात पर्वतीय बोगद्यांपैकी २.१ किमी खोदकाम पूर्ण.

  • वैतरणा, उल्हास आणि जगाणी नद्यांवर पूल बांधकाम सुरू.

  • बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स-शिळफाटा यादरम्यान २१ किमी भूमिगत/समुद्राखालील बोगद्याचे काम सुरू; त्यात सात किमी ठाणे खाडीखालील बोगदाही समाविष्ट.

  • विक्रोळी आणि सावली शाफ्टवर बेस स्लॅब पूर्ण, तर महापे यार्डात टनल लाइनिंग सेगमेंटचे उत्पादन सुरू.

  • बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स स्थानकाचे ८३ टक्के खोदकाम पूर्ण; १०० फूट खोलीवर बेस स्लॅबचे काम सुरू.

राष्ट्रीय महामार्गाची एक लेन किती रुंद असते?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.