सीएमए सेलकडून साखर कारखाने, सूतगिरण्या, खरेदी- प्रक्रिया संस्थांना कर्ज पुरवठा
महामंडळाच्या कर्जावर बॅंकेकडून घेतले जाणारे एक टक्का जादा व्याज कपात
महिलांसाठी जिल्ह्यात ५४ हजार ११७ गट स्थापन असून, त्यापैकी ३५ हजार ८७८ गटांना दीडशे कोटींचे कर्ज वाटप
लाडक्या बहिणींसाठी ताराराणी महिला सक्षमीकरण कर्ज योजना
नवीन वेतन वाढ करार झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना सरासरी चार ते सहा टक्क्यांपर्यंत पगारवाढीचा लाभ मिळाला
‘रुग्णालय, हॉटेल अशा व्यावसायिकांना वित्त पुरवठा करणे, शैक्षणिक कर्जाचा व्याजदर १२ वरून आठ टक्के, लाडका सचिव योजना सुरू केल्याची घोषणा आज वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सर्वसाधारण सभेत केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ८७ वी सर्वसाधारण सभा आज महासैनिक दरबार हॉल येथे झाली.
सभेची वेळ दुपारी एकची होती. पण, सकाळी अकरा वाजेपर्यंत संपूर्ण सभागृह गर्दीने भरले होते. मुश्रीफ म्हणाले, ‘सभासदांना दोन कोटी १६७ कोटींवरून सात हजार ४२३ कोटींवर कर्ज दिले. केंद्र शासन कृषी कर्जमाफ योजना २००८, अनिष्ट तफावत रकमेत विना व्याज १५ वर्षे मुदतीने हप्ते बंधकारक करण्याचे धोरण, परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान, कृषी ड्रोन खरेदीला प्रोत्साहन देण्यासठी दहा लाखांपर्यंत कर्ज धोरण या योजना राबविल्या आहेत.’
संस्था सक्षमीकरणासाठी गट सचिवांना बक्षीस, पगार मिळणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी जाहीर केले. ‘लाडका सचिव’ म्हणून त्यांनी याचा उल्लेख केला. संस्था संगणकीकरणाबाबत पूर्वी देवस्थान जमीन, करार जमीन, कूळ जमीन यांना कर्ज दिले जात नव्हते. मात्र, देशात आपली एकमेव बॅंक आहे, जिने या सर्वांना कर्ज दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. कॉर्पोरेट फायनान्स म्हणून हॉटेल, रुग्णालय, औद्योगिक क्षेत्रासाठी फर्म प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एलएलपी क्षेत्रांनासुद्धा वित्तपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, संचालक आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, संजय मंडलिक, सुधीर देसाई, रणजितसिंह पाटील, माजी आमदार राजेश पाटील, रणवीरसिंग गायकवाड, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, श्रृतिका काटकर, विजयसिंह माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रा. अर्जुन आबिटकर, प्रताप माने, स्मिता गवळी, संजय घाटगे, दिलीप लोखंडे, इम्तेहाज मुनशी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी अहवाल वाचन केले.
KDCC Bank Issues : केडीसीसीच्या शाखा म्हणजे 'बडा घर पोकळ वासा', परदेशात जाऊन अभ्यास करणाऱ्या संचालकांनी ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा!पी. एन. पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजना
बॅंकेचे दिवंगत संचालक ‘आमदार पी. एन. पाटील पीक प्रोत्साहन अनुदान’ योजना सुरू करीत असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी जाहीर करताच सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत केले. या योजनेत सभासद पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन म्हणून बॅंकेकडील पीक कर्ज खात्यावरील एक टक्का रिबेट देण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.
‘सकाळ’ मधील वृत्ताची दखल
शैक्षणिक कर्ज सवलतीची मागणी वारंवार होत होती. आज दैनिक ‘सकाळ’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची माहिती देऊन मुश्रीफ यांनी शैक्षणिक कर्जावर १२ ऐवजी आठ टक्के व्याजदर आकारला जाईल, असे जाहीर केले. बॅंकतर्फे शेतकऱ्यांच्या पाल्यांना देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षणासाठी तीस लाख रुपये कर्ज दिले जाते. विकास संस्थांनी कर्जावर एक टक्का मार्जिन घेऊन नऊ टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.