घरी बोलावलेल्या नातेवाईकांच्या जेवणात विषारी मशरूम समावेश करून त्यांची हत्या केल्याप्रकरणी एरिन पॅटरसन या ऑस्ट्रेलियन महिलेला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे.
दोन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी 'त्या' दिवशी एरिनच्या डायनिंग टेबलवर नेमकं काय घडलं होतं, याचं गूढ जगभर कायम होतं. त्याचा अखेर उलगडा झाला आहे आणि गुन्हेगार असलेल्या एरिक पॅटरसनला शिक्षाही सुनावण्यात आलीय.
8 सप्टेंबर 2025 रोजी एरिनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तिला पॅरोलशिवाय 33 वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
2023 मध्ये फॅमिली लंच म्हणजेच कुटुंबासाठी बनवलेल्या दुपारच्या जेवणात तिनं विषारी मशरूमचा समावेश केला होता.
29 जुलै 2023 रोजी ऑस्ट्रेलियाच्या ग्रामीण भागात एरिकच्या घरी पाच लोक जेवण करत होते.
आठवडाभरातच त्यातील तिघांचा मृत्यू झाला, चौथा जीवन-मृत्यूशी झुंज देत होता आणि पाचवा आपल्या पाहुण्यांना मुद्दाम विषारी मशरूम दिल्याप्रकरणी चौकशीच्या घेऱ्यात होता.
मॉरवेल हे छोटंसं शहर असलं तरी कोर्टाच्या या प्रदीर्घ सुनावणीकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.
यावर्षी जुलैमध्ये एरिनला आपल्या तीन नातेवाईकांची हत्या आणि चौथ्या नातेवाईकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान तिनं या हत्या कश्या केल्या आणि का केल्या हे समोर आलं आहे.
ऑरेंज प्लेटएरिननं स्वतःला मशरूमप्रेमी आणि मशरूम शोधण्यात स्वारस्य असणारी हौशी व्यक्ती असल्याचं सांगितलं होतं. तिनं याला एका अपघाताप्रमाणं न्यायालयात सादर केलं होतं.
परंतु, नऊ आठवड्यांच्या सुनावणीदरम्यान, ज्युरीनं सर्व पुरावे पाहिले आणि ऐकले, तेव्हा असं आढळून आलं की, एरिननं आजूबाजूच्या शहरांमधून विषारी मशरूम गोळा केले होते आणि दुपारच्या जेवणात त्यांचा समावेश केला होता.
एरिननं पोलिसांशी खोटं बोलून पुरावेही नष्ट केले होते.
त्या र्दुदैवी शनिवारच्या दुपारी गेल आणि डॉन पॅटरसन हातात ऑरेंज केक घेऊन एरिनच्या दारात होते.
त्याच्यासोबत विल्किन्सन कुटुंबीय सुद्धा होतं. गेलची बहीण हीथर आणि तिचा नवरा इयान, जो या लंचनंतर काही आठवड्यांनी कोमामधून बाहेर आला आहे. इयान हा एकमेव पाहुणा आहे जो या लंचनंतर जिवंत राहिला आहे.
एरिनचा नवरा सायमन पॅटरसन तिथं नव्हता. एक दिवस आधीच त्यानं लंचला येण्यास नकार कळवला होता.
सायमन म्हणाले की, लंचला येण्याबाबत त्यांना अस्वस्थ वाटत होतं. परस्पर कलहातून या जोडप्यानं विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
एरिननं सकाळपासून खूप मेहनत घेऊन देशातील आवडत्या शेफपैकी एकाची रेसिपी तयार केली.
त्यानं त्यात बदल करून 'बीफ वेलिंग्टन'चे वेगवेगळे पदार्थ बनवले. बनवण्यासाठी त्यात बदल करण्यात आला. मशरूमची पेस्ट मांसाच्या महागड्या तुकड्यांवर लावून पेस्ट्रीमध्ये गुंडाळली होती.
ज्युरीसमोर इयान म्हणाला की, त्यानं मांसाच्या तुकड्यांना चार तपकिरी प्लेटमधून घेऊन जाताना पाहिलं होतं. एरिनसाठी बाजूला एका केशरी प्लेटमध्ये मॅश केलेले बटाटे, हिरव्या बीन्स आणि ग्रेव्ही ठेवली होती.
सहावी सर्व्हिंग सायमनसाठी होती, असं सांगण्यात आलं. एरिनला आशा होती की सायमन शेवटच्या क्षणी त्याचा न येण्याचा निर्णय बदलू शकतो.
ही प्लेट फ्रिजमध्ये ठेवण्यात आली होती. एरिनवर यापूर्वी सायमनच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला गेला होता. पण नंतर तो आरोप मागे घेण्यात आला होता.
सर्वांना लंच देण्यात आला आणि सर्वांनी प्रार्थना करून जेवन सुरू केलं. जेवताना सगळे गमतीनं एकमेकांना किती खात आहेत असं म्हणत होते.
सुनावनी दरम्यान सांगण्यात आलं की, जेवणानंतर लोकांनी मिठाई खाल्ली, पण त्याच वेळी एरिननं तिला कॅन्सर झाल्याचं सांगितलं. हे सर्वांनाच धक्का देणारं होतं.
एरिनच्या बाजूच्या लोकांनाही ते खरं वाटलं नाही. पण त्या दिवशी त्या दोन वयोवृद्ध जोडप्यांनी एरिनला आपल्या मुलांना याबद्दल कसं सांगावं याचा सल्ला दिला होता.
लंचची सुरुवातीला जशी प्रार्थनेनं करण्यात आली तशीच सांगता ही प्रार्थनेनं झाली. इयान यांनी कोर्टाला सांगितलं की, ते यजमानांना नीट ओळखत नव्हते, मात्र त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते.
एरिन सामान्य व्यक्तीसारखी दिसत होती, असं इयान म्हणतात.
रात्री उशीरापर्यंत सर्व पाहुणे खूप आजारी पडले होते आणि दुसऱ्या दिवशी गंभीर लक्षणं असलेल्या चौघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डॉन यांनी सांगितलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या तुलनेत अर्ध खाल्लं होतं, परंतु काही तासांतच त्यांना 30 उलट्या झाल्या. लंचनंतर तीन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला, मात्र, इयान बचावले.
एरिनबद्दल लवकरच संशय निर्माण झाला होता.
सायमन म्हणाले की, आपल्या पूर्व पत्नीनं असं आदरातिथ्य दाखवणं ही खूप असामान्य बाब होती.
इयान म्हणालें की त्यांनीं आणि त्यांच्या दिवंगत पत्नीनं एरिनचं घर यापूर्वी कधीही पाहिलं नव्हतं. एरिनची थाळी वेगळी का आहे, ही बाब एका पाहुण्यासाठी धक्कादायक होती.
नंतर लिओंगाथाच्या दवाखान्यात आजारी पडलेल्या पाहुण्यांनी एरिनही आजारी आहे का, अशी विचारणा केली. कारण सगळ्यांनी सारखंच जेवण खाल्लं होतं ना?
एक ऑरेंज केककोर्टरूममध्ये पहिल्यांदाच एरिननं लंचबाबतीत जाहीरपणे स्पष्टीकरण दिलं.
नातेवाइकांचा निरोप घेतल्यानंतर तिनं स्वयंपाकघर स्वच्छ केलं आणि त्यानंतर गेलनं आणलेला ऑरेंज केकचा तुकडा खाल्ल्याचं तिनं न्यायालयाला सांगितलं.
एरिन म्हणाली, "मी केकचे बरेच तुकडे खाल्ले. तिला काही कळायच्या आत उरलेला केक संपला होता आणि माझं पोट भरून गेलं होतं. त्यानंतर मी टॉयलेटमध्ये गेले आणि नंतर उलट्या झाल्या. उलट्या झाल्यानंतर मला थोडं बरं वाटलं."
ज्युरीसमोर एरिननं बुलिमिया नावाच्या मानसिक आजारानं ग्रस्त असल्याचा ही उल्लेख केला.
लंचनंतर दोन दिवसांनी एरिन आजारी असल्याचं सांगून रुग्णालयात गेली. पण सुरुवातीला एरिननं स्वत:ला आणि आपल्या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला. एरिननं आपल्या मुलांनी शिल्लक राहिलेलं अन्न खाल्ल्याचा दावा केला होता.
पण अखेर जेव्हा डॉक्टरांनी एरिनला तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा तिच्यात किंवा तिच्या मुलांमध्ये घातक मशरूम खाल्ली असल्याची चिन्हं दिसली नाहीत.
खबरदारी म्हणून चोविस तास घालवल्यानंतर एरिनला रुग्णालयातून पाठवण्यात आलं.
धोक्याची चिन्हेमात्र, एरिनच्या घरी जेवलेले लोक रुग्णालयात तडफडत होते. सतत जुलाब आणि उलट्यांमुळे अवयवांनी काम करणं बंद केल्यानंतर एरिननं स्वत:ला वाचवायला सुरूवात केली असल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एरिन स्थानिक परिसरातील कचऱ्याच्या डब्यात फूड डिहायड्रेटर फेकताना कैद झाली. नंतर त्यात विषारी मशरूमचे अंश आढळून आले.
लंचच्या वेळी ती तीन फोन वापरत होती, त्यातील दोन फोन काही वेळातच गायब झाले. तिनं पोलिसांना दिलेल्या फोनमधून अनेक गोष्टी काढून टाकण्यात आल्या होत्या. तिच्या घराची झडती घेतली जात असताना तिनं हे कृत्य केलं.
तपासकर्त्यांना लवकरच विविध प्रकारचे संकेत मिळू लागले.
मशरूमच्या स्त्रोताविषयी विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं विचित्र होती.
तिनं दावा केला की, त्यापैकी काही मेलबर्नमधील आशियाई किराणा दुकानातून वाळवून विकत घेण्यात आलेत, मात्र तो कोणता परिसर होता हे तिला आठवत नाही.
ब्रँड किंवा व्यवहाराच्या नोंदींबद्दल विचारले असता, ते साध्या पॅकेजिंगमध्ये होते आणि बहुधा रोख पैसे दिले गेले असावेत असं ती म्हणाली.
लंचच्या काही आठवड्यांपूर्वी जवळच्या दोन भागांमध्ये प्राणघातक मशरूम आढळल्याचंही तपासकर्त्यांना समजलं.
काळजीपोटी स्थानिकांनी ऑनलाइन प्लांट डेटाबेस iNaturalist वर फोटो आणि ठिकाण पोस्ट केले होते.
एरिनच्या सर्च हिस्ट्रीमध्ये असं दिसून आलं की तिनं यापूर्वी किमान एकदा तरी विषारी मशरूमची माहिती शोधण्यासाठी वेबसाइटचा वापर केला होता.
तिच्या मोबाइल फोन लोकेशन डेटावरून असं दिसून आलं की तिनं दोन्ही भागात प्रवास केला होता आणि त्यापैकी एका वेळी घरी येताना तिनं फूड डिहायड्रेटर खरेदी केला होता.
पण एरिननं पोलिसांना सांगितलं की, स्वयंपाकघरातील ड्रॉवरमध्ये पुस्तिका असूनही तिच्याकडं असं उपकरण कधीच नव्हतं. तिनं एका ट्रू क्राईम फेसबुक ग्रुपवर पोस्ट केली होती, ज्यात तिनं त्याचा वापर केल्याचा दावा केला होता.
डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्यांच्या उपकरणांमधून काही साहित्य जप्त केलं तेव्हा त्यांना स्वयंपाकघरातील तराजूवर प्राणघातक मशरूमचं वजन केलं जात असल्याचं चित्र आढळलं.
हेतू स्पष्ट नाहीमात्र, त्यामागचा हेतू काय होता, ही गोष्ट पोलिसांचा गोंधळात टाकत होती.
सायमन यांनी सुनावणीदरम्यान सांगितलं की, 2015 मध्ये विभक्त झाल्यानंतर त्यांचे आणि एरिनचे संबंध सुरुवातीला चांगले होते.
ते म्हणाले, 2022 मध्ये जेव्हा दोघांमध्ये आर्थिक, मुलांचे संगोपन, शाळा आणि मालमत्ता यांबाबत मतभेद सुरू झाले, तेव्हा ही परिस्थिती बदलली.
ते म्हणाले की त्यांच्या कुटुंबाप्रती कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावनेची संभावना असल्याचं दिसत नव्हतं. "तिचे विशेषतः आपल्या वडिलांशी चांगले संबंध होते. दोघांमध्येही ज्ञान आणि शिकण्याबाबत एकसारखंच प्रेम होतं."
परंतु एरिननं स्वत: कोर्टाला सांगितलं की तिला पॅटरसन कुटुंबापासून अधिकाधिक अलिप्त वाटू लागलं होतं आणि तिनं फेसबुकवर मेसेजमध्ये सायमन यांच्या पालकांबाबत अपशब्दांचा वापर करून वाईट बोललं होतं.
सरकारी पक्षानं या हत्येमागचा कोणताही स्पष्ट हेतू सांगितला नाही. स्पष्ट हेतूचा अभाव हा एरिनच्या बचावात्मक युक्तिवादाचा एक महत्त्वाचा भाग होता.
तिच्या वकिलांनी सांगितलं की, तिच्या सासरच्या लोकांवर केलेली टीका केवळ अनावश्यक राग व्यक्त करण्यासाठी करण्यात आली होती.
तिनं सांगितलं की कर्करोग असल्याचा दावा प्रत्यक्षात वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेला लपविण्यासाठी केला गेला होता. ती शस्त्रक्रिया करणार होती पण त्याबद्दल सांगण्यास कचरत होती.
बचाव पक्षानं असंही म्हटलं आहे की मोबाईल फोनच्या लोकेशनचा डेटा फारसा अचूक नसतो, त्यामुळे एरिन विषारी मशरूम सापडलेल्या भागात गेली होती हे सिद्ध करता येत नाही.
ती म्हणाली की कर्करोगाचा दावा प्रत्यक्षात वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया लपवण्यासाठी होता. ती शस्त्रक्रिया करणार होती परंतु त्याबद्दल सांगण्यास ती संकोच करीत होती.
बचाव पक्षानं असंही म्हटलं आहे की, मोबाइल फोन लोकेशनडेटा फारसा अचूक नव्हता, त्यामुळे एरिन ज्या भागात विषारी मशरूम आढळले त्या भागात गेले होते हे सिद्ध झाले नाही.
वकिलांनी सांगितलं की एरिन देखील ते खाल्ल्यानंतर आजारी पडली, परंतु इतरांसारखी गंभीर नाही, कारण तिनं सर्व अन्न फेकून दिल होतं. तिला रुग्णालय आवडत नव्हतं, म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरही तिनं स्वत:चा डिस्चार्ज करून घेतला.
परंतु एरिननं इतकी खोटी विधानं केली होती की त्यांचा हिशेब ठेवणं अवघड होतं, असं सरकारी वकिलांनी सांगितलं.
'हा फक्त एक भयानक मशरूम निवडण्याचा अपघात होता' हा युक्तिवाद नाकारण्यात त्यांना 'कोणतीही अडचण' येऊ नये असं सरकारी वकिल नॅनेट रॉजर्स यांनी ज्युरीला सांगितलं.
अखेर ज्युरीनं फिर्यादी पक्षाच्या बाजूनं निकाल दिला.
पॅटरसन आणि विल्किन्सन कुटुंबियांनी गोपनीयतेची मागणी केली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)