अवजड वाहनांविरोधात नागरिकांचा एल्गार
esakal September 09, 2025 09:45 PM

तलासरी, ता. ८ (बातमीदार) : उधवा-मोडगाव मार्गावरून अवजड वाहनांची सर्रास वर्दळ सुरू असल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी व तीनचाकी वाहनचालकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर ग्रामस्थांनीच थेट संताप व्यक्त करत रविवारी (ता. ७) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून जाणाऱ्या ४५ अवजड वाहनांना अडवले. यानंतर त्याचा माहिती पोलिस प्रशासनाला माहिती दिली.

केंद्रशासित प्रदेश दादरा-नगर हवेलीहून येणारी ही वाहने सरकारचा कर चुकवण्यासाठी उधवा-मोडगाव या आडमार्गाचा वापर करतात. त्यामुळे या मार्गाची दयनीय अवस्था झाली असून, प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी पहाटेच्या वेळी वाहने अडवली. या अडवलेल्या अति अवजड वाहनांवर कारवाईची मागणी केली. कासा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे ४५ अवजड वाहने ताब्यात घेतली. पुढील कारवाईसाठी ही सर्व वाहने पालघर प्रादेशिक परिवहन कार्यालय विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. सध्या अडवलेली वाहने तलासरी-दापचरी जकात नाक्यावर तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. अतिभार आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली.


उधवा-मोडगाव मार्गावरून रात्रीच्या वेळी सतत अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडून ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अखेर ग्रामस्थांच्या एकमताने पोलिसांच्या मदतीने ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
- प्रवीण ठाकरे, ग्रामस्थ

रात्रीच्या वेळी दक्ष नागरिकांचा तक्रार कॉल मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन अवजड वाहने थांबवून कागदपत्रे तपासणी केली. ती वाहने पुढील कारवाईसाठी पालघर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.
- अविनाश मांदळे, पोलिस निरीक्षक, कासा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.