हत्तीरोग मुक्त सिंधुदुर्गाचे स्वप्न भंगले
आरोग्य यंत्रणेला डोकेदुखी ः आतापर्यंत ९ रुग्ण सापडले
नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः सिंधुदुर्ग हत्तीरोग मुक्त करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. ही मोहीम यशस्वी होते असे वाटत असतानाच गतवर्षी ७, तर जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत नव्याने २ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर आणि परिसरात हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. सद्यस्थितीत जिल्ह्यात हत्तीरोगाचे एकूण ६८ रुग्ण आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत ४ हजार ६६२ रक्तनमुने गोळा करून मालवण येथील रात्र चिकित्सालयात तपासण्यात आले, त्यामध्ये नव्याने २ रुग्ण सापडले आहेत.
गतवर्षी २०२४ मध्ये तब्बल बारा वर्षांनंतर ७ हत्तीरोग रुग्ण आढळले होते. त्यापूर्वी २०११ पासून जिल्ह्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच हत्तीरोगमुक्त जाहीर करण्याची तयारी केली होती. मात्र, २०२४ पासून नव्या रुग्णांचा शोध लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. २०११ पासून २०२३ पर्यंत रात्र चिकित्सालयात दरवर्षी काही संशयित व्यक्तींचे रक्त नमुने तपासले गेले. पण, त्यात एकही रुग्ण सापडला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातून हत्तीरोगाचे निर्मूलन झाले, असे प्रशासनाला वाटत होते. मात्र, नव्याने रुग्ण आढळू लागल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
हत्तीरोग हा सूक्ष्म परजीवी जंतूमुळे होतो. रक्त शोषण करणाऱ्या डासांमुळे (क्युलेक्स मादी) याचा प्रसार होतो. या आजारामुळे प्रामुख्याने हातापायांवर व जननेंद्रियावर टणक सूज येते आणि शरीर विद्रूप होते. हा रोग फक्त मानवातच नव्हे, तर इतर प्राण्यांतही आढळतो.
मानवाच्या शरीरात विषारी अळी प्रवेश केल्यानंतर ती रसग्रंथी व रक्तवाहिन्यांमध्ये वाढते. पूर्ण वाढ होण्यासाठी साधारण १८ महिने लागतात. नर-मादी कृमींचे मिलन होऊन मादी कृमी भ्रूण अवस्थेतील असंख्य जंतू निर्माण करते. हे जंतू लसिका ग्रंथीत वास्तव करतात. त्यांची आयुर्मर्यादा साधारण १५ ते २० वर्षे असते. क्युलेक्स मादी डास एका वेळी हजारो मायक्रोफायलेरिया निर्माण करते. हे जंतू मानवाच्या शरीरात ३ ते ६ महिने राहतात. अशा रक्तात मायक्रोफायलेरिया असलेली व्यक्ती रोगाचा संसर्ग पसरवते. अनेकदा हे वाहक लक्षणविरहित असतात. एकदा रोग पूर्ण विकसित झाला की, नंतर मात्र रक्तात जंतू आढळणे कठीण असते.
प्रारंभी या आजाराची लक्षणे साध्या सर्दी, पडसे, अंगावर पुरळ, डोकेदुखी अशा स्वरूपात दिसतात, त्यामुळे निदान करणे अवघड ठरते. हत्तीरोगाचा शोध घेण्यासाठी रात्रीच्या वेळी रक्त नमुने तपासले जातात. दाहक अवस्थेत काखेत किंवा जांघेत गंडा येतो, गंडा दुखतो, लालसर होतो, थंडी वाजून ताप येतो, दुधाळ रंगाची लघवी दिसते. तसेच हातापायांवर सूज, अंडवृद्धी, वक्षस्थळ किंवा गुप्तांगावर सूज येते. लघवी तपासल्यावर त्यात मायक्रोफायलेरिया आढळतात. त्वचा जाडसर व घट्ट होते, सुजेवर दाब दिल्यास गड्डा पडत नाही आणि औषधोपचार करूनही सूज कायम राहते. त्यामुळे हातापायांबरोबर पुरुषांमध्ये अंडकोष व लिंगावर, तर स्त्रियांमध्ये स्तनांवर व जननेंद्रियांवर सूज येऊन कायमची विद्रूपता येते. या डासाची मादी रात्रीच्या वेळी चावा घेते, त्यामुळे या आजाराचा शोध घेण्यासाठी सायंकाळी ८ ते रात्री १२ या वेळेत रुग्णांचे रक्त नमुने घेऊन तपासणी केली जाते.
चौकट
६८ रुग्ण निगराणीखाली
जानेवारी २०२५ पासून मालवण शहर व परिसरातील ४६६२ व्यक्तींचे रक्तनमुने तपासले गेले. त्यामधून नव्याने २ रुग्ण आढळले असून, सद्यस्थितीत जिल्ह्यातील ६८ रुग्ण आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली आहेत.
कोट
हत्तीरोग हा संसर्गजन्य रोग नाही. मात्र, त्याचा प्रसार डासांद्वारे होतो. त्यामुळे रुग्णाच्या थेट संपर्कातील लोकांची तपासणी आवश्यक आहे. मालवण येथे कायमस्वरूपी रात्र चिकित्सालय सुरू असून, हत्तीरोग निर्मूलनासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- रमेश कर्तसकर, जिल्हा हिवताव अधिकारी, सिंधुदुर्ग
कोट
हत्तीरोग औषधोपचाराने पूर्णपणे बरा होत नसला, तरी त्याचा प्रसार थांबवण्यासाठी आणि नवे रुग्ण सापडू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सातत्याने प्रयत्नशील आहे.
- डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी