खाकी वर्दीचा सणासुदीत आधार
जिल्ह्यात दोन हजार पोलिसांची अखंड सेवा
अलिबाग, ता. ८ (वार्ताहर)ः रायगड जिल्ह्यात ईद, गणेशोत्सवासाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव दलाचे दोन हजार जवान तैनात होते. त्यामुळे २४ तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांमुळे दोन्ही सण निर्विघ्न पार पाडले आहेत.
गणेशोत्सवात नागरिकांचा उत्साह पाहायला मिळतो. बाजारात सातत्याने गर्दी असते. यामुळे वाहतुकीचेही नियोजन विस्कळित होते, मात्र पोलिस दिवसरात्र ठिकठिकाणी तैनात असल्याने उत्सव आनंदी झाला. जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव काळात उपअधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, ठाणे अंमलदार, पोलिस कॉन्स्टेबल आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवत, पोलिस दलाने निभावलेल्या सेवेचे जिल्हावासी कौतुक करीत आहेत.
-----------------------
वाहतुकीचे चोख नियोजन
गणेशोत्सव काळात त्याचप्रमाणे विसर्जनानंतर कोकणवासींची परतण्याची लगबग सुरू होते. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग, अलिबाग-पेण मार्ग, वडखळ बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी होते. अशा स्थितीत परतीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी वाहतूक पोलिस दिवस-रात्र रस्त्यावर उभे राहिल्याने वाहतूक कोंडी उद्भवली नसल्याचे चित्र होते.
-------------------------------
जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे गणेशोत्सव शांततेत पार पडला. यापुढेही जिल्ह्यातील शांतताभंग होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची काळजी घेण्यात येईल
- आंचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक