Vasai Virar Municipality: अतिधोकादायक इमारतींना महापालिकेच्या नोटिसा, कारवाई करण्याचा इशारा
esakal September 10, 2025 05:45 AM

विरार : वसई-विरार महापालिका परिसरात शेकडोंच्या संख्येने अनधिकृत बांधकामे आहेत. अनेक ठिकाणी अनधिकृत इमारती धोकादायक झाल्या असून विरारमधील दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन आता सक्रीय झाले आहे. पालिकेने अतिधोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या असून, त्यांना प्रतिसाद न देणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. या इमारतींचे पाणी, वीजजोडणी ताेडण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पालिकापरिसरातील धोकादायक इमारतींचा सव्र्हे करून त्यांची यादी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जाहीर करण्यात येते. नुकताच विरार येथील रमाबाई अपार्टमेंट ही अनधिकृत, अतिधोकादायक असलेली इमारत कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू आणि ९ जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे अशा अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांवर या प्रकारच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी पालिकेने तत्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Palghar News: स्वप्नातील इमले मृत्यूचे सापळे! वसई-विरारमधील दुर्घटनांचे सत्र कायम; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वसई-विरार शहरात १९६ इमारती अतिधोकादायकआहेत. या इमारतींना मेमध्ये नोटिसा बजावल्या होत्या, मात्र घरे खाली न केल्याने सर्वात आधी घरे खाली करण्यासाठी पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर आधी वीज आणि पाणी जोडणीदेखील कापण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वतःहून खाली न केल्यास पोलिसांच्या मदतीने घरे खाली करत नागरिकांना बाहेर काढून घरे खाली झाल्यानंतर तोडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले. घरे खाली करून देण्यासाठी पोलिसांसोबत पत्रव्यवहार केला आहे.

विरार पूर्व येथे घडलेल्या दुर्घटनेसारख्या घटना भविष्यात होऊ नयेत, यासाठी धोकादायक इमारतींविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. अशा इमारतींमधील नागरिकांना सर्वप्रथम नोटीस देऊन इमारत खाली करण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. त्यानंतरच नियमांनुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.

- संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, वसई-विरार महापालिका

Mumbai Local: लोकल कोंडीतून सुटका कधी? ‘एमयूटीपी’वर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च; गर्दी कायम
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.