पिंपरी : प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात मिरवणूक काढण्यात आली. भरपावसात पारंपरिक वेशभूषेत मुस्लिम बांधव सहभागी होते. ‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. सजवलेल्या गाड्या, पताका, शुभेच्छा फलक घेऊन मदरशांचे विद्यार्थीही यात सहभागी होते.
मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून संचलन करत ‘दुरूदो सलाम’, नात-ए-रसूलचे पठण केले जात होते. मुस्लिमबहुल वस्त्यांमध्ये विद्युत रोषणाई, हिरवे ध्वज, पताके लावून सजावट करण्यात आली. ठिकठिकाणी आकर्षक स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या. सामाजिक संघटना, कार्यकर्त्यांकडून अल्पोपहार, पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
परिसरातील मशिदीपासून दुपारी दोन वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. धर्मगुरूंनी मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण तथा प्रगतीसाठी विशेष प्रार्थना केली. मुख्य मिरवणूक मिलिंदनगर, पिंपरीगाव, दापोडी, चिखली कुदळवाडी, डांगे चौक, थेरगाव, निगडी, भोसरी, मोशी, अजमेरा कॉलनी, नेहरूनगर या भागांतून सुरू झाल्या.
सायंकाळी साडेसहादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संघटना दाखल झाल्या.
अ व फ प्रभाग जुलूस कमिटी
संघटनेतर्फे भक्ती-शक्ती चौकातून महामार्गाने अजिंठानगर, यमुनानगर, सेक्टर २२, निगडी गावठाण, रुपीनगर-तळवडे या परिसरांतील नागरिकांनी एकत्र येत जुलूस काढला. या परिसरातील मोठ्या संख्येने मंडळे (तंजीम) सहभागी झाले. यावेळी निगडी पुलाखाली मंडळांचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुराणपठण, मौलवींनी प्रवचन दिले. मौलाना फैज अहमद फैजी, मौलाना इरफान फैजी, मौ. इशतियाक, मौ. हासीम रजा, मौ. समशाद, जुलूस समिती अध्यक्ष आलमबाबा शेख आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या नियोजनात फिरोज सय्यद, मगबूल शेख, नासिर शेख, अब्दुल अत्तार, इजाज खान, फारूक शेख, हुसेन मास्टर, हुसेन जमादार, मोईन यांनी पुढाकार घेतला.
चिखली वाजतगाजत मिरवणूक
ईदनिमित्त चिखली परिसरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शुभेच्छा दिल्या. जुना गाव परिसरातील संत सावता माळी भवन येथे काँग्रेस कमिटीतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड जुलूस समिती
जुलूस समितीचे अध्यक्ष रमजान आत्तार, नासीर शेख, अकबर मुल्ला, सलीम मेमन, युसूफ कुरेशी, झिशान सय्यद, हाजी गुलाम रसूल, शहाजी आत्तार आदींनी मिरवणुकीचे स्वागत केले. बिहार येथील धर्मगुरू हजरत अल्लामा मौल्लाना मुफ्ती शहरयार कादरी यांचे प्रवचन झाले. सूत्रसंचालन मौलाना नय्यर नुरी यांनी केले. शहाबुद्दिन शेख, अकबर मुल्ला, रियाज शेख, रज्जाक शेख, मुस्तफा अहमद, हबीब शेख आदींनी ‘अली की तलवार’चा देखावा सादर केला.