Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम
esakal September 11, 2025 07:45 AM

सुनंदन लेले

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताची मोहीम आज बुधवारपासून सुरू होत आहे. प्रतिस्पर्धी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध भारतीयांचे पारडे जड असले तरी त्यांना दुबळे न समजता रविवारच्या पाकविरुद्धच्या सामन्याची तयारी सूर्यकुमार यादवच्या संघाला करायची आहे. गेल्या काही महिन्यांत भारतीय संघाने एकत्र टी-२० सामने खेळले नसले तरीही भारतीय संघ आशिया कप दणाणून सोडायला तयार झाला आहे, असेच म्हणावे लागेल.

चांगले फलंदाज आणि दर्जेदार गोलंदाज भारतीय संघात असल्याने आणि टी-२० क्रिकेटचा भरपूर अभ्यास केला गेला असल्याने भारतीय खेळाडू योग्यवेळी योग्य खेळ करायची क्षमता राखून आहेत. संयुक्त अरब अमिरातीचा संघ दिसतो तेवढा कमजोर नाही, असे स्थानिक पत्रकार सांगत आहेत. कारण कागदावर कमजोर आणि नवखा दिसणाऱ्या संघातील खेळाडूंकडे टी-२० क्रिकेट खेळायचा पुरेसा अनुभव असल्याचा दाखला ते देत आहेत.

Asia Cup Records: सर्वात मोठा विजय, सर्वाधिक धावा ते बेस्ट बॉलिंग, जाणून घ्या १० खास रेकॉर्ड्स; विराट - रोहितही सामील

चांगल्या लढतीची अपेक्षा व्यक्त करताना स्थानिक संघ चांगली फलंदाजी करून धावा करेलही कदाचित, पण भारतीय संघाच्या धावा रोखणार कोण, असा सवालही मांडत आहेत. थोडक्यात संयुक्त अरब अमिरातीचे फलंदाज कदाचित भारतीय गोलंदाजांसमोर उभे राहून बऱ्या धावा फलकावर लावतील, पण गोलंदाजीतील कमजोरी सामन्यात उघडी पडेल, असेही सांगत आहेत.

संयुक्त अरब अमिरातीचा कप्तान मुहम्मद वसीम एक तरबेज आक्रमक फलंदाज आहे. स्थानिक दोन मोठ्या टी-२० स्पर्धांमध्ये सतत चांगली कामगिरी केल्याने स्पर्धेचा मानकरी ठरलेला वसीम तडाखेबाज फलंदाजी करतो. वयाची पस्तिशी पार केलेला असीफ वसीमला तोलामोलाची साथ फलंदाजीत देत आला आहे. बाकी संघात भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान वंशाचे खेळाडू भरलेले आहेत. संघाला लालचंद राजपूत प्रशिक्षण देतो आहे.

Asia Cup 2025: खरंच, सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधारासोबत हस्तांदोलन करणे टाळले? Viral Video ने समोर आलं सत्य...

४० अंश तापमानात कस लागणार संयोजकांनी गरम हवेचा विचार करून सामने अर्धा तास उशिराने चालू करायचा घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही इतकी हवा गरम आहे. ४० अंश सेल्सिअस इतकी गरम हवा दुबईच्या बंदिस्त स्टेडियममध्ये अजून त्रास देणारी असेल. भारतीय संघाने मुद्दामहून गरम हवेत सराव करून हवामानाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाला कोणत्या चार खेळाडूंना संघाबाहेर ठेवायचे, ही डोकेदुखी आहे. त्यातील एक यष्टिरक्षक, हर्षित राणा आणि रिंकू सिंग नक्कीच बाहेर असतील. अजून एका फलंदाजाला बाहेर ठेवावे लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.