मंडळनिहाय जास्तीत जास्त हवामान केंद्र हवी
esakal September 11, 2025 10:45 AM

मंडळनिहाय जास्त हवामान केंद्र हवी
बागायतदारांची मागणी ; नोंदींमध्ये अचूकता येईल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १० ः जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता हवामानातील बदल नोंदवण्यासाठी बसवण्यात आलेल्या हवामान यंत्रांची संख्या कमी आहे. प्रत्येक महसूल मंडळात एक याप्रमाणे अवघी ८२ हवामान केंद्रे असली तरीही प्रत्येक गावाच्या हवामानातील बदल टिपला जात नसल्याची तक्रार बागायतदारांकडून होते. त्यामुळे विमा कवच घेऊनही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी होतात. यावर उपाययोजना म्हणून जास्तीत जास्त हवामान केंद्र सुरू करावीत, अशी मागणी बागायतदारांकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १,५५१ गावे आहेत; मात्र त्या ठिकाणी सर्वत्र उच्चतम तापमान, कमी-जास्त, अवेळीचा पाऊस, नीचांकी तापमान, गारपीट, हवामान बदल टिपण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळातील हवामान केंद्र सक्षम नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामानकेंद्राचा निर्णय घेतला असला तरी जागेची उपलब्धता हा अडसर ग्रामपंचायतींसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ८२ महसूल मंडळे असून, प्रत्येक मंडळात एक हवामान यंत्र बसवण्यात आले आहे. महसूल मंडळातील दोन गावांतील अंतर जास्त आहे. गावातील हवामान वेगळे असल्यामुळे अचूकता फारशी नसते. त्यासाठी जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर ३०२ स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार असून, जागा उपलब्धतेसाठी प्रस्ताव पाठवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.