शहापूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात निदर्शने
esakal September 11, 2025 12:45 PM

शहापूरमध्ये जनसुरक्षा विधेयकाविरोधात निदर्शने
शहापूर, ता. १० (वार्ताहर) : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता.१०) दुपारी शिवस्मारकाजवळ जोरदार निदर्शने केली. भारतीय संविधानाचा विजय असो, जनसुरक्षा कायदा रद्द करा, अशा घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा आरोप केला. उबाठा शिवसेनेचे काशिनाथ तिवरे यांनी हे विधेयक दडपशाही आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अविनाश थोरात यांनी हे विधेयक म्हणजे सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी वापरले जाणारे ‘अस्त्र’ असल्याची भीती व्यक्त केली.
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले की, नक्षलवादाशी संबंधित विद्यमान कायदे पुरेसे कठोर आहेत. त्यामुळे वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही. नव्या विधेयकानुसार सरकारला कोणत्याही व्यक्तीला अटक आणि तुरुंगात टाकण्याचा आणि त्यांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार मिळणार असल्याने विरोधकांचा आवाज गप्प केला जाईल, असा दावा त्यांनी केला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे, विद्या वेखंडे, शिवसेना ठाकरे गटाचे कुलदीप धानके, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र विशे, महेश धानके, किसान सभेचे कॉ. विजय विशे, मधुकर उबाळे, अश्विनी वारघडे, भालचंद्र भालके, विजय देशमुख, मिलिंद देशमुख यांच्यासह मविआचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भिवंडीत शिवसेना ठाकरे गटाचे निदर्शने
भिवंडी, ता. १० (वार्ताहर) : राज्य सरकारने लागू केलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ विरोधात राज्यभरातून निदर्शने सुरू आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात भिवंडी लोकसभा महिला आघाडी संपर्क संघटिका आशा रसाळ, जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहर प्रमुख प्रसाद पाटील, महानगरप्रमुख अरुण पाटील, जिल्हा संघटिका वैशालीताई मेस्त्री, जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी, शहर समन्वयक नाना झळके, पश्चिम सचिव नितेश दांडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. व्यापारी संघटना अध्यक्ष मनीष बंटी गिरी, कामगार सेना अध्यक्ष पप्पान शेख, उपशहर प्रमुख संतोष भावार्थी, भाई वनगे, गणेश मोरे, स्वप्नील जोशी, हर्षल राऊत, अनिस सिद्दीकी, विजय कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले. जनसुरक्षा कायदा हा घटनाविरोधी असून लोकशाही हक्क नाकारणारा आहे, असे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मविआची जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी
मुरबाड, ता. १० (वार्ताहर) : मुरबाड तहसिल कार्यालयात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी (ता. १०) राज्यपालांना निवेदन सादर करून जनसुरक्षा कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हा कायदा घटनाविरोधी असून लोकशाही हक्क नाकारणारा असल्याचा दावा आघाडीने केला आहे.
भाजपप्रणित राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात बहुमताचा वापर करून हा कायदा मंजूर केला. विरोधी पक्ष, सामाजिक संघटना व बुद्धिजीवी नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी आणलेला हा काळा कायदा असल्याचा आघाडीचा दावा आहे. मुरबाड तालुक्यातील नागरिक आणि इंडिया आघाडीबरोबर मविआने या कायद्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. अशोक फनाडे, तालुकाध्यक्ष इंजि. चेतनसिंह पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा घुडे, सिटू तालुकाध्यक्ष कॉ. दिलीप कराळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, कार्याध्यक्ष विलास भावार्थे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संतोष विशे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, शिवसेना संघटक सतीश भोईर, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अभिषेक डुंकवाल, ओबीसी तालुका उपाध्यक्ष किसन भोईर, दशरथ चौधरी, भगवान तारमळे, शिवाजी धानके, अतुल देशमुख, योगेश पाटील, दुर्वेश मुरबाडे उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.