Ichalkaranji Politics : इचलकरंजीत शिंदे गट, भाजपचे टेन्शन वाढवणार? ३५ जागांची केली चाचपणी; महायुतीसाठी वजनदार मंत्र्यांच्या घरी बैठक
esakal September 12, 2025 02:45 AM

Ichalkaranji Politics : पंडित कोंडेकर : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असली तरी महायुतीचे काय, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. याबाबत शुक्रवारी (ता.१२) कोल्हापुरात एका वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीत प्राथमिक चर्चा होणार आहे. भाजपकडून स्वबळाचा नारा दिला असला तरी शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून तब्बल ३५ जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यामुळे महायुती न झाल्यास भाजपचे टेन्शन शिवसेना वाढविण्याची शक्यता आहे.

लोकसभा, विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीला महाविकास आघाडी एकसंधपणे सामोरे जात आहे. त्यासाठी आघाडीकडून व्यूहरचना आखली जात आहे. दर बुधवारी काँग्रेस भवनात बैठक घेऊन महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली जात आहे. संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी मजबूत नसली तरी त्यांच्याकडून नियोजनबध्द कार्यक्रम आखला जात आहे. त्यांचा महायुतीकडून उमेदवारी न मिळणा-यावर डोळा आहे. त्याचाही चाचपणी त्यांनी आतापासूनच सुरू केली आहे.

दुसरीकडे महायुती होणार काय, याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही.भाजपचा स्वबळाचा नारा अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी भाजप व शिवसेना यांचे स्वतंत्र स्वागत कक्ष होते. एकत्रीत स्वागत कक्ष करण्याबाबत दोन्हीपक्षात मतभेद झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे महायुतीबाबतचा गुंता वाढत जाण्याची शक्यता आहे. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्यामुळे फारशा राजकीय घडामोडी अपेक्षित नाहीत. मात्र कोल्हापुरात शुक्रवारी (ता.१२) एका वजनदार मंत्र्यांच्या उपस्थितीत महायुती करण्याबाबत तसेच भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Kolhapur politics : 'सतेज पाटील आणि राजू शेट्टी कर्जमाफीवरून ओरडत आहेत'; मुश्रीफांकडे सतेज पाटलांनी पाहताच शब्द फिरवला, जिल्हा बँकेच्या सभेत नेमकं काय घडलं?

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचे मौन हे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या गटातील इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. उमेदवारीची खात्री नसल्यामुळे त्यांच्यात गोंधळाची परिस्थिती आहे. भाजपमधील उमेदवारी देताना कोणाचे वर्चस्व राहणार याचीही चर्चा रंगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अद्याप महायुतीमधील जागांबाबत पत्ते खुले केलेले नाहीत. पण, शिवसेना (शिंदे गट) मात्र गतीने कामाला लागल्याचे गणेशोत्सवात दिसून आले आहे. सध्या या पक्षाकडून तब्बल ३५ जागांवर संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली आहे. त्यामुळे महायुती झाल्यास जागा वाटपचा गुंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

नेत्यांचा शब्द, इच्छुकांची कोंडी

भाजपकडून स्थानिक पातळीवरील शिर्ष नेतृत्वाने काही जणांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. त्यामुळेच वर्षापासून निवडणुकीची तयारी केलेल्यांना मात्र हक्काच्या प्रभागातून उमेदवारीसाठी डावलण्याची शक्यता आहे. अशा काही जणांना दुसरा प्रभाग शोधण्याचाही सल्ला दिला जात आहे. त्यामुळे कोणालाही सध्या १०० टक्के उमेदवारीची हमी नसल्यामुळे अस्वस्थता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.