Sai Durbar: साई दरबारातील भाविकांची 'काउंटिंग'; प्रिस्मा एआय कंपनीकडून सॉफ्टवेअर भेट, संस्थानकडून डाॅ. श्रीराम अय्यर यांचा सत्कार
esakal September 12, 2025 05:45 PM

शिर्डी: साईदर्शनासाठी नेमके किती भाविक आले आणि गेले, याची दैनंदिन गणती करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित पीपल काउंटिंग प्रणाली आजपासून साई संस्थानमध्ये कार्यान्वित करण्यात आली. प्रिस्मा एआय कंपनीचे अध्यक्ष डाॅ. श्रीराम अय्यर यांनी या प्रणालीचे साॅफ्टवेअर साई संस्थानला भेट दिले. त्यांच्या उपस्थितीत साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आज ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली.

आनंदाची बातमी! 'गायीच्या दूध दरात तीन रुपयांपर्यंत वाढ'; सातारा जिल्ह्यात सुमारे ५५ हजार दूध उत्पादकांना दिलासा

या प्रणालीमुळे दर्शनार्थी भाविकांची नेमकी संख्या उपलब्ध होईल. त्याआधारे साई संस्थान आणि राज्य सरकारला भविष्यातील विकास योजनांचे नियोजन करणे सुलभ होईल. भाविकांच्या सुरक्षेसह दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करता येईल. साई संस्थानच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात असलेल्या यंत्रणेत हे साॅफ्टवेअर आज लोड करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व सीसीटीव्ही विभागप्रमुख राहुल गलांडे यांच्यासह या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना गाडीलकर म्हणाले की, या नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होईल. दर्शनानंतर ‘मुखदर्शन आऊट’ व ‘बुंदी प्रसाद आऊट’ येथेही भाविकांचे आऊट काउंटिंग केला जाईल.

भाविकसंख्येच्या अचूक नोंदीमुळे भोजन, निवास व अन्य सुविधा अधिक नियोजनबद्धपणे उपलब्ध करून देता येतील. तसेच गर्दीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारनिहाय भाविकांचे विभाजन करता येईल. त्यातून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होईल. सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेऱ्यांवर सुरू करण्यात आली आहे. आगामी काळात पालखी रस्त्यासह पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील कॅमेरे देखील या यंत्रणेशी जोडले जातील. दर्शन व सुरक्षा व्यवस्थापनसाठी ही प्रणाली अतिशय उपयुक्त ठरेल.

Smart Meter: मीटरचा हिशोब ‘स्मार्ट’ की फसवा?; वाढीव वीजबिलांमुळे ग्राहक संतप्त, दुरुस्तीसाठी महावितरण कार्यालयात रांगा

या नव्या प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. पोलिसांना हवे असलेले संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील. अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षायंत्रणेला तत्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेला बळकटी येऊ शकेल.

- गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साई संस्थान, शिर्डी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.