डॉ. सविता दाभाडे यांना पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ११ ः येथील सुप्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सविता दाभाडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानासाठी आदर्श पुरस्कार जाहीर झाला आहे. दापोली येथील रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन या संस्थेकडून राज्यभरातील व्यक्तींमधून उत्कृष्ट कामासाठी डॉ. दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉ. दाभाडे या चिपळुणातील ‘ॐ कार दातांचा दवाखाना’च्या संचालिका आहेत. त्यांनी चिपळूण शहर व परिसरात आलेल्या महापूरानंतर महिनाभर मोफत दंततपासणी आणि अल्पदरात उपचार केले. विविध शाळा, कॉलेज येथे विद्यार्थ्यांना दातांच्या आरोग्यविषयक माहितीपर प्रेझेंटेशन आणि मोफत दंततपासणी उपक्रम घेतले आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील महिलांसाठी नवरात्रोत्सवात ‘बेस्ट स्माईल कॉन्टेस्ट’ ही स्पर्धा घेतात. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी त्या लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलक्सीच्या माध्यमातून समाजकार्यातदेखील अग्रेसर आहेत. सध्या त्या क्लबच्या सचिव म्हणून काम बघतात. २८ सप्टेंबर रोजी पुणे येथील कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.