राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जीआर सरकारने काढला आहे. हा जीआर काढल्यानंतर आता पुन्हा एकदा ओबीसी आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. या गॅझेटवर बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ?
हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारच्या भूमिकेवर मंत्री भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र मराठा आरक्षण नको का? असा सवाल भुजबळांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला दिलेलं स्वतंत्र दहा टक्के आरक्षण नकोय का? ते रद्द करायचं का? ते रद्द झालं तर ईडब्ल्यूएसमध्ये ही तुम्हाला आरक्षण आहे ते पण तुम्हाला नकोच का? याचं उत्तर महाराष्ट्रात मराठा समाजाचे अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रातही मराठा समाजाचे मंत्री होते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा आहे. ज्याला काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहिती नाही, त्यांच्याकडून मला या उत्तराची अपेक्षा नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान भुजबळ यांच्या या प्रश्नाला मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. मी अशिक्षित असो किंवा शिक्षित असू तुम्हाला तर रडकुंडीला आणलं ना? तुमचा जो उद्देश होता, मराठा समाजाला आरक्षण मिळू न द्यायचा, त्याच्यावर तर मी पाणी फेरलं. मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रतही आरक्षणात गेला, असं जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
दुसरीकडे जीआर हा कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारा आहे, या जीआरमुळे कुठेही ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.