Sahyadri Tiger Reserve news : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवण्यासाठी मोठा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला आहे. पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारच्या मागणीला मान्यता देत ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातून ८ वाघ (३ नर, ५ मादी) पकडून सह्याद्रीत स्थलांतर करण्याची परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या चांदोली विभागाने तयार केला होता. त्यामुळे या ठिकाणी वाघिणी आल्यानंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा नर वाघांचा प्रवास नैसर्गिकरित्या होणार आहे. आता वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.
महाराष्ट्र वन्यजीव विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बेन क्लेमेंट यांनी याबाबत आदेश काढले आहेत. यासाठी केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक, केंद्रीय डी. जी. फॉरेस्ट अवस्ते, वन सचिव मिलिंद म्हैसकर यांनी प्रयत्न केले. यामध्ये या वाघांना पकडणे आणि त्यांच्या स्थलांतर प्रक्रियेदरम्यान वाघांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्यावी, योग्य पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देत ही मोहीम राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली पार पाडावी, असे या मंत्रालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
Melghat Tiger: मेळघाटातील नरसंहारात 'कॅटरीना'वर संशय; 'पंजाब'ची फॅमिली ठरतेय शिकारीचा केंद्रबिंदूवन्यजीवप्रेमी व संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता पेंच आणि ताडोबा येथील ८ वाघांचे सह्याद्रीत अस्तित्व निर्माण होणार आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांच्या डोंगररांगांमध्ये पसरलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील तुलनेने नवीन व्याघ्र प्रकल्प मानला जातो. शिकार प्रजातींची उपलब्धता, दाट जंगल व योग्य अधिवास असतानाही वाघांची हालचाल मर्यादित राहिली आहे.
जैवविविधतेला चालना ताडोबा व पेंच हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे वाघांचे अधिवास असून येथे तुलनेने संख्या जास्त आहे. येथून स्थलांतरित होणारे वाघ सह्याद्रीत नवीन जीवनक्षेत्र निर्माण करतील. यामुळे कोल्हापूर, रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेला चालना मिळेल. सह्याद्रीत वाघ वाढले तर संपूर्ण सह्याद्री घाटमाळेला पर्यावरणीय व पर्यटनदृष्ट्या नवे महत्त्व प्राप्त होईल. निसर्गप्रेमी, वन पर्यटक, आकर्षण वाढेल.
अशा आहेत अटी आणि शर्ती
वाघांना पकडणे आणि स्थलांतर करणे हे राज्य वन विभागाच्या देखरेखीखाली काटेकोरपणे केले जाईल.
त्यांना पकडणे आणि स्थलांतर करण्याच्या सर्व टप्प्यांवर पुरेशी पशुवैद्यकीय काळजी घेतली जाईल. ते अत्यंत सावधगिरीने केले पाहिजे.
त्यांना पकडल्यानंतरची गुंतागुंत टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल.
संपूर्ण कारवाईदरम्यान वाघांना कमीत कमी दुखापत होईल याची खात्री घेणार.
पकडणे आणि स्थलांतर करताना आणि नंतर मुख्य वन्यजीव वॉर्डन/राज्य वन विभाग नियमित देखरेख करेल. मुख्य वन्यजीव वॉर्डनद्वारे तिमाही अहवाल मंत्रालयाला सादर केले जातील.
मंत्रालयाने पूर्वपरवानगी दिलेल्या सर्व मागील पकडण्याच्या आणि स्थानांतरणाच्या कामांचे अहवाल पुढील विनंती करण्यापूर्वी महाराष्ट्रातील मुख्य वन्यजीव वॉर्डनमार्फत मंत्रालयाकडे पाठवले जातील.
या प्रक्रियेदरम्यान वाघांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी किंवा धोक्यात आणणारी कोणतीही घटना घडल्यास, मंत्रालय दिलेल्या परवानगीचा आढावा घेऊ शकते आणि रद्द करू शकते.