बचावकार्य करणाऱ्या स्थानिक तरुणांकडे दुर्लक्ष
टिटवाळा, ता. १५ नद्यांमध्ये बुडणाऱ्यांचा शोध, घाटांतील अपघात तसेच आपत्तीत अडकलेल्यांना मदत करणे, अशा प्रत्येक प्रसंगी प्रशासनाच्या आधी स्थानिक तरुणच मदतीसाठी पुढे सरसावतात. विशेषतः आदिवासी व कातकरी समाजातील तरुणांनी गेल्या अनेक वर्षांत अनेक जीव वाचवले आहेत; मात्र त्यांच्या कार्याची दखल अद्याप प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही.
अलीकडेच टिटवाळ्यातील काळू नदीत दोन बहिणी बुडाल्याच्या घटनेतही हेच चित्र पाहायला मिळाले. अग्निशमन दल प्रयत्न करत असतानाच वांसुर्दी वाडीतल्या रंजीत वाघे, बाबू वाघे, गोविंद वाघे, आकाश वाघे, गोरख वाघे, राहुल वाघे, त्रुतीक वाघे, सागर वाघे, कल्पेश वाघे, दीपक वाघे, जगदीश वाघे आणि विशाल दिवे या स्थानिक तरुणांनी पाण्यात उतरून अलिया अन्सारीचा मृतदेह शोधून काढला. सना अन्सारीचा मृतदेह मात्र २८ तासांनंतर गांधारी खाडीत सापडला. या घटनेत स्थानिकांनी दिलेले योगदान महत्त्वाचे असूनही त्यांच्या नावाचा कुठेच उल्लेख झाला नाही. केवळ काळू नदीच नव्हे, तर भातसा, बारवी, उल्हाससारख्या नद्यांमध्ये, तसेच माळशेज आणि कसारा घाटातील अपघातांमध्येही अशाच प्रकारे स्थानिक तरुणांनी बचावकार्य केले आहे. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांपेक्षा या तरुणांची तत्परता आणि अनुभव अधिक प्रभावी ठरत आहे. त्यामुळे शासनाने त्यांना अधिकृत प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत सामावून घ्यावे, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.