हडपसर : गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा व शहरात असलेल्या प्रशासकराजमुळे सामान्य नागरिकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या व आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ते स्वतः नागरिकांना भेटून या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याची सुरुवात काल (ता. १३) हडपसर येथून झाली आहे. या कार्यक्रमांतर्गत सुमारे चार हजार तक्रारी त्यांच्यासमोर आल्या.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींपैकी १ हजार ५०० पेक्षा अधिक तक्रारींचे निराकरण जागेवरच करण्यात आले. या तक्रारींमध्ये पाणीपुरवठा व वाहतूक कोंडीशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात नोंदविल्या गेल्या. उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतः सलग पाच तास तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांशी स्वतः संवाद साधून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला.
आमदार चेतन तुपे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, बी. पी. पृथ्वीराज, जिल्हा बँकेचे सुरेश घुले, माजी आमदार महादेव बाबर, मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. शंतनु जगदाळे यांच्यासह अमर तुपे, संदीप बधे, नीलेश मगर, अजित घुले आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाची निष्क्रियताया जनसंवाद कार्यक्रमात परिसरातील हजारो नागरिक, कार्यकर्ते आपापल्या समस्या घेऊन रांगेने मुख्यमंत्री पवार यांना भेटत होते, तर अनेक नागरिक व त्या त्या विभागाच्या स्टॉलवर जाऊन आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात होता. त्याचवेळी एकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष व निष्क्रियतेमुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या असल्याची चर्चा उपस्थित नागरिकांच्या गटागटात रंगली होती.