जे. जे. रुग्णालयात मोफत रोबोटिक शस्त्रक्रिया!
गृहिणीवर यशस्वी बेरियाट्रिक सर्जरी; प्रगत उपचार सामान्यांच्या आवाक्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : सार्वजनिक आरोग्यसेवेत एक अभूतपूर्व कामगिरी करत, ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. रुग्णालयातील जनरल सर्जरी विभागाने रोबोटिक बेरियाट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ही शस्त्रक्रिया ग्रामीण महाराष्ट्रातील ३६ वर्षीय गृहिणीवर करण्यात आली. विशेष म्हणजे, या अत्याधुनिक उपचारासाठी तिला एकही पैसा खर्च करावा लागला नाही. या महत्त्वाच्या पावलामुळे प्रगत उपचार सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत.
३६ वर्षीय गृहिणी अनेक वर्षे मॉर्बिड ओबेसिटी व त्यासंबंधित गुडघेदुखीशी लढत होती. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी रुग्णालयातील उपचार तिला परवडत नव्हते. ११ सप्टेंबर रोजी जे. जे. मध्ये तिच्यावार रोबोटिक बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया रोबोटिक तंत्रज्ञानामुळे अधिक सुरक्षित, अचूक व कमी वेदनादायक झाली, तर १० सप्टेंबर रोजी मूत्ररोग विभागात दोन शस्त्रक्रिया झाल्या. २० वर्षांच्या मुलीला मूत्रपिंड व मूत्रनलिकेचा अडथळा होता, तर ६७ वर्षीय विश्वास यांना उजव्या मूत्रपिंडातील खडे व जखमांमुळे मूत्रपिंड निष्क्रिय झाले होते. या दोन्ही रुग्णांवर यशस्वी रोबोटिक मूत्रपिंडासंबंधित शस्त्रक्रिया झाली.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व जनरल सर्जरी विभागाचे प्राध्यापक डॉ. अजय एच. भंडारवार यांच्या प्रयत्नांमधून या सुविधा सुरू केल्या गेल्या आहेत. ही शस्त्रक्रिया डॉ. भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गिरीश डी. बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी व डॉ. सुप्रिया भोंडवे या कुशल व समर्पित शल्यचिकित्सकांच्या टीमने केली. भूलतज्ज्ञांची टीम प्रो. व विभागप्रमुख डॉ. उषा बडोले यांच्या नेतृत्वाखाली डॉ. भरत शाह व डॉ. अश्विनी सोनटक्के यांनी हाताळली.
जागतिक दर्जाचे उपचार मोफत
रोबोटिक शस्त्रक्रिया सेवा रुग्णांना पूर्णतः मोफत उपलब्ध झाली आहे. स्थूलता (मॉर्बिड ओबेसिटी) असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांसाठी ही सुविधा म्हणजे वरदान ठरली आहे, कारण खासगी रुग्णालयांतील महागड्या खर्चाचा भार न घेता त्यांना आता जागतिक दर्जाचे उपचार उपलब्ध आहेत.