नाशिक: ‘शासकीय काम अन् सहा महिने थांब’, असे नेहमीच बोलले जाते. पण, शासकीय पातळीवर याच विचाराला छेद देण्याचे कार्य लोकशाही दिनाच्या माध्यमातून केले जात आहे. यंदा विविध लोकशाही दिनातून ७२ तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल आहेत. यातील ३९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारींचा तत्काळ निपटारा करून सामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी तालुक्यापासून ते जिल्हा, तसेच विभागीय पातळीवर हा दिन साजरा केला जातो. छोट्या-मोठ्या कामांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिझवणाऱ्या नागरिकांना या माध्यमातून त्यांच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांचाही लोकशाही दिनातून तक्रारींचा निपटारा करून घेण्याकडे ओढा वाढला आहे.
जिल्ह्यात यंदा १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विविध लोकशाही दिनांमधून तब्बल ७२ तक्रारी महसूल प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. यामधील जिल्हाधिकारी कार्यालयातील २८ तक्रारी आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पातळीवरील चार, तहसील कार्यालयांशीनिगडित १४ तक्रारींचा समावेश आहे. तसेच अन्य शासकीय विभागांच्या तक्रारींची संख्या २६ इतकी आहे.
महसूलशी संबंधित दाखल तक्रारींत साधारणतः सातबाऱ्यावर चुकीच्या नोंद घेणे, तहसील पातळीवर जमिनीशीनिगडित सुनावणीचा निकाल अमान्य असणे अशा तक्रारी आहेत. जिल्हा प्रशासनाकडून या तक्रारींची दखल घेताना महसूलच्या तक्रारी तातडीने सोडविण्याच्या सूचना वरिष्ठांकडून तालुक्यांना दिल्या गेल्या आहेत. अन्य विभागांशी संबंधित तक्रारी या त्यांच्या-त्यांच्या स्तरावर वर्ग करण्यात आल्या आहेत.
२००७ पासून अंमलबजावणी
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने २००७ मध्ये १५ सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. लोकशाहीच्या तत्त्वांचा प्रचार व समर्थन करण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. सार्वजनिक जागरूकता वाढीसाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्य राष्ट्रांना आणि संघटनांना हा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित केले जाते.
महिलांमध्ये अजूनही अनास्था
महिलांच्या समस्या व अडचणींची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो; परंतु या दिनाबाबत आजही महिला वर्गात अनास्था असल्याचे दिसून येते. ऑगस्ट २०२४ ते २०२५ या वर्षभराच्या कालावधीत जिल्हास्तरीय लोकशाही दिनात केवळ दोन तक्रारी दाखल झाल्या. विशेष म्हणजे, या दोन्ही तक्रारींमध्ये माहेरच्या व्यक्तींनी विश्वासघात केल्याची व्यथा पीडितांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडली.
Samruddhi Expressway: ‘समृद्धी’ केवळ वेगात; सुविधेत मात्र दरिद्री, प्रवाशांना सापडेना दूरदूरपर्यंत वॉशरूम, महिलांची कुचंबणालोकशाही दिनाच्या माध्यमातून शासनाने जनतेला त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे जनतेच्या तक्रारी व कामांचे निराकरण अधिक गतीने होण्यास मदत मिळते. लोकशाही दिनाच्या कार्यपद्धतीत बदल करायचे असल्यास नागरिकांनी त्यादृष्टीने सूचना कराव्यात.
- जलज शर्मा, जिल्हाधिकारी, नाशिक