Accident: भरधाव ट्रकने 15 वाहनांना उडवलं, अपघातानंतर जमावाने ट्रकला लावली आग, इंदूरमध्ये तणाव
Tv9 Marathi September 16, 2025 03:45 PM

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. विमानतळ रस्त्यावर एका भरधाव ट्रक चालकाने 15 ते 20 वाहनांना धडक दिली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातानंतर संतप्त लोकांनी रस्त्यावरच ट्रकला आग लावली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इंदूर शहरातील विमानतळ रोडवर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर जमावाने आक्रमक रूप धारण करत ट्रकला आग लावली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या पथकाने ट्रकला लागलेली आग विझवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या परिसरात तणाव अजूनही कायम आहे. सध्या अतिरिक्त डीसीपी आलोक शर्मा पोलीस दलासह घटनास्थळी हजर आहेत, ते नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकांमध्ये भीतीचे वातावरण

सायंकाळच्या वेळेस विमानतळ रस्त्यावर खूप गर्दी असते. याच गर्दीच्यावेळी एक ट्रक खूप वेगाने आला आणि त्याने रस्त्यावर धावणाऱ्या 15 ते 20 वाहनांना धडक दिली. अचानक झालेला हा अपघात पाहून लोक घाबरले. अपघातात जखमी झालेल्या लोकांनी आरडाओरडा झाला. त्यामुळे आसपासच्या लोकांनी पळून जाणाऱ्या ट्रकला पकडले आणि त्याला आग लावली. अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे.

ट्रकला लावली आग

या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रकला आग लावली. मार्केट रोडच्या मध्यभागी हा ट्रक जळ होता. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ अग्निशमन दलाच्या पथकाला याबाबत माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. या घटनेचे गांभीर्य पाहून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीसांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.