Team India’s Jersey Sponsor: टीम इंडियाच्या जर्सीवर आता या कंपनीचं नाव, प्रत्येक सामन्यासाठी देणार इतके पैसे
GH News September 16, 2025 07:16 PM

आशिया कप 2025 स्पर्धेत भारतीय संघाने साखळी फेरीतील सलग दोन सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात युएई आणि दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं सुपर 4 फेरीतील स्थान पक्कं झालं आहे. पण या स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीवर स्पॉन्सर नाही. कारण केंद्र सरकारने एक बिल पास केलं आणि ड्रीम 11 चा बाजार उठला. बीसीसीआयने देखील ड्रीम 11 सोबत असलेला तीन वर्षांचा करार वेळेआधीच संपवला. त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर स्पॉन्सर नाही. पण आता टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला आहे. टीम इंडियाच्या जर्सीवर आता अपोलो टायर कंपनीचं नाव असणार आहे. बीसीसीआयने अपोलो टायरसोबत 2027 पर्यंत करार केला आहे. या दरम्यान टीम इंडिया जवळपास 130 सामने खेळणार आहे. यात टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकपचा समावेश असणार आहे.

बीसीसीआयने एक अहवाल देत स्पष्ट केलं होतं की, गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि टोबॅको कंपन्यांनी स्पॉन्सर होण्यासाठी अर्ज करू नये. इतकंच काय तर बँकिंग, फायनान्शियल कंपनीज, स्पोर्टवियर तयार करणाऱ्या कंपन्यांनाही नकार दिला होता. यासाठी अर्ज करण्याची तारीख 2 सप्टेंबर होती. तर लिलावासाठी बोली 16 सप्टेंबरला लागली. रिपोर्टनुसार, अपोलो टायर एका सामन्यासाठी भारतीय संघाला 4.5 कोटी रुपये देईल. मागच्या करारापेक्षा ही रक्कम 50 लाखाने अधिक आहे. ड्रीम इलेव्हन एका सामन्यासाठी 4 कोटी रुपये देत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या जर्सी स्पॉन्सरच्या शर्यतीत कॅनवा आणि जेके टायरही होते. पण अपोलो टायरने बाजी मारली. इतकंच काय तर बिरला ऑप्ट्स पेन्ट्सनेही प्रायोजक होण्यास रस दाखवला होता. पण ते लिलावात उतरले नाहीत.

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाच्या जर्सीवर अपोलो टायरचा नाव सध्यातरी दिसणं कठीण आहे. कारण या स्पर्धेत भारतीय संघ विना जर्सीचा उतरला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या जर्सीवर अपोलो टायर हे नवं आशिया कप स्पर्धेनंतरच दिसेल. भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत नवा स्पॉन्सर दिसू शकतो. नव्या स्पॉन्सरमुळे भारतीय संघाला केवळ मजबूत ब्रँड समर्थन मिळेल. इतकंच काय तर अपोलो टायर्सची ओळख आणि बाजार मूल्य देखील मोठ्या प्रमाणात वाढेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.