मला माझ्या पद्धतीने जगायचंय... सिनेसृष्टीतून निवृत्त होणार नाना पाटेकर? नाम फाउंडेशनही केलं 'या' व्यक्तीच्या स्वाधीन
esakal September 16, 2025 08:45 PM

आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टी गाजवणारे लोकप्रिय मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर यांनी हिंदी सिनेमांमध्येही आपली छाप पाडली. त्यांनी कायमच वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. 'क्रांतीवीर', 'परिंदा', 'अन्नीसाक्षी', 'तिरंगा' यांसारख्या चित्रपटात ते मुख्य भूमिकेत होते. यातील त्यांच्या भूमिकांचं विशेष कौतुक झालं. त्यासोबतच त्यांच्या, 'नटसम्राट', 'पक पक पकाक' यांसारख्या चित्रपटातील भूमिकाही गाजल्या. मात्र नाना आता अभिनय क्षेत्रातून निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जातंय. नाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात त्यांनी सूचक वक्तव्य केलंय.

नुकताच नाम फाउंडेशनचा दशकपूर्ती सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणले, ' आजवर खूप काम केलं आहे. त्यामुळे आता मनासारखं जगावं असं वाटत आहे. एक जानेवारीला मी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करीन. त्यानंतर नाटक, सिनेमातून निवृत्त होऊन गावखेड्यांतील विवंचना समजून घ्याव्यात, त्यांच्यासाठी काही करावं, असं वाटतं. नाम फाउंडेशनची धुराही आता मकरंदनेच पुढे न्यावी. कान धरायला आणि पाठीवर थाप द्यायला मी सोबत असेनच.'

View this post on Instagram

A post shared by राजमुद्रा_फिल्म्स™ (@rajmudra_films)

नाना पुढे म्हणाले, 'पंचाहत्तरीनंतर नाटक, सिनेमातून निवृत्त व्हावं,असं वाटतंय. म्हणजे ज्यातून तुम्हाला खूप काही सांगता येईल, अशी एखादी छान कलाकृती वाट्याला आली तर ती करेनही. पण आता मला माझ्या पद्धतीने जगू द्या," असं नाना यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर नाम फाउंडेशनचा पुढील कारभार आता मकरंद अनासपूरे सांभाळतील असंही त्यांनी जाहीर केलं.

नाना नुकतेच 'हाऊसफुल ५' मध्ये दिसले होते. त्यांनी गावाला एक फार्महाउस बांधलं आहे. तिथे नाना आता आरामात वेळ घालवताना दिसतात.

अरे यार! अर्जुनची सगळी मेहनत वाया; प्रिया निर्दोष सुटली, पण कशी? नेटकरी म्हणाले- प्रेक्षकांना शेंड्या लावून...
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.