बीड: राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बंजारा समाजानेही आपल्याला एसटीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी सोमवारी (ता. १५) मोर्चा काढण्यात आला होता. एसटीचे आरक्षण लागू करा अन्यथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन म्हणून साजरा केला जाईल, असा इशारा विराट मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला आहे.
बीडमध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी दुपारी एक नंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा माळीवेस, सुभाष रोड, आण्णाभाऊ साठे चौक, बसस्टँड समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये बंजारा समाज पारंपारिक वेषभुशेत सहभागी झाला होता. एकच मिशन एसटी आरक्षण अशा घोषणांचे फलक हाती घेतलेल्या समाज बांधवांनी एसटी आरक्षणाची आग्रही मागणी सरकार आणि प्रशासनासमोर मांडली. या मोर्चाला जिल्हाभरातून बंजारा समाज बांधव प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील युवतींनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी मोर्चात बंजारा समाजाचे धर्मगुरू बापूसिंग महाराज, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर, मराठा समन्वयक, गंगाधर काळकुटे, योगश क्षीरसागर यांच्यासह समाज बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाला होता.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काळा दिन साजरा करणार
लाखोंच्या संख्येने दाखल झालेले बंजारा बांधव आपल्या न्याय हक्काची मागणी करत आहे. इंग्रज सरकारांपासून ते निजाम सरकारांपर्यंत सर्वांनीच बंजारा समाजाला आदिवासी म्हणून नोंदी केलेले आहेत. इतर सर्व राज्यात बंजारा समाजाला एसी आणि एसटीमध्ये आरक्षण आहे मग महाराष्ट्रातच व्हीजेएनटी आणले कुठून? असा सवाल उपस्थित करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पहिले आरक्षण बाबत हालचाली न केल्यास मराठवाडा मुक्ती संग्राम दिन काळा दिन म्हणून महाराष्ट्रातील बंजारा समाज साजरा करणार असे मोर्चाला संबोधित करणाऱ्या मुलींनी व्यक्त केली.
यांनी दिला मोर्चात जाहीर पाठींबा
मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या सूचनेवरून मराठा कृती समितीचा जाहिर पाठींबा, धनगर महासंघ, वंजारी महासंघ, आ.धनंजय मुंडे, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर यांनी मोर्चात सहभागी होत जाहिरात पाठिंब्याचे पत्र दिले.
धनंजय मुंडे म्हणाले, बंजारा-वंजारा एक; नागरिकांकडून नाहीचा सूर
बीड मधील बंजारा मोर्चादरम्यान पाठिंब्याचे मत व्यक्त करताना धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला वंजारा-बंजारा एक असल्याचे म्हटले. यावेळी उपस्थित बंजारा बांधवांनी नाहीचा सूर दिला. बंजारा समाजाची वेशभूषा, बोली भाषा तसेच राहणीमान वेगळे असून बंजारा समाज नेहमी गावापासून कोसोदूर तांड्यावर स्वतंत्र राहतो. यापूर्वीही बंजारा अन वंजारा एक असल्याचे सांगत व्हीजेएनटी प्रवर्गात घुसखोरी केली. आता समाज जागृत झाला असून बंजारा-वंजारा एक नसल्याचे प्रतिउत्तर धनंजय मुंडे यांना जागेवर देण्याचं काम समाजातील नागरिकांनी केलं.