वेल्हे, ता. १४ : राजगड तालुक्यामध्ये तीन टप्प्यांमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून यामध्ये शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.
तहसीलदार ढाणे म्हणाले की, जिल्हाधिकारी पुणे व उपविभागीय अधिकारी भोर व राजगड यांच्या मार्गदर्शनाखाली ''छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मांगदरी, करंजावणे, मालवली, लव्ही बुद्रूक, चिरमोडी, भागीनघर, निगडे खुर्द, पाल बुद्रूक, शेनवड, खामगाव, रानवडी, कोलंबी, माणगाव, निगडे बुदूक, धापसरे, ओसाडे या गावांमध्ये शिवार फेरी पूर्ण केली आहे. उर्वरित गावांची शिवार फेरी सरपंच, उपसरपंच, मंडलअधिकारी, ग्राम महसूलअधिकारी, पोलिस पाटील, कोतवाल यांच्या समवेत करून गावातील रस्त्यांची यादी निश्चित केली जाणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत रस्त्यांची सीमांकन केले जाणार आहे व सर्व रस्ते गाव नकाशावर दर्शविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचे पट्टे वाटप केले जाणार आहेत तर तिसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना दारिद्र्यरेषेमध्ये नाव असलेल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती मागील तीन वर्षात मयत झाला असेल योजनेअंतर्गत २० हजार रुपये अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पात्र कुटुंबातील व्यक्तींनी ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा तर जिवंत सातबारा यामध्ये मयत असलेल्या व्यक्तींचे वारस नोंद केली जाणार आहे. यासाठी गावचे ग्राम महसूल अधिकारी किंवा महा-ई-सेवा केंद्र सेतू कार्यालयामार्फत ऑनलाइन अर्ज दाखल करावा व सर्व विभागाचे प्रलंबित असलेले कामकाज केले जाणार आहेत तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.