भोर, ता. १७ : भोर-शिरवळ मार्गावरील उत्रौली आणि वडगाव डाळ गावांच्या दरम्यान मोटारीने दुचाकीला ठोकरल्याने राजेवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत अरुण शेडगे (वय ३१) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी (ता. १६) रात्री साडेसातच्या सुमारास घडला.
याबाबत भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अनिकेत मंगळवारी सायंकाळी दुचाकी (क्रमांक एमएच ११ बीसी ५२८२) वरून घरी राजेवाडीला निघाला होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे तो जागीच ठार झाला. अपघातानंतर मोटारचालक अंधाराचा फायदा घेऊन मोटारीसह पसार झाला. याबाबत मयत अनिकेतचा भाऊ अजिंक्य याने भोर पोलिसांना खबर दिली. पोलिस हवालदार मच्छिंद्र कराडे, प्रियांका जगताप, यशवंत शिंदे, अभय बर्गे, विशाल मोरे, ज्ञानेश्वर शेडगे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि अनिकेतला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोर शिरवळ मार्गावरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. आरोपीचा लवकरच शोध घेतला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांनी सांगितले.