बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
esakal September 18, 2025 10:45 AM

तळेगाव ढमढेरे, ता. १७ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कामिनी ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोध पथकाला सापडला.
सूरज अशोक राजगुरू (वय ३०, सध्या राहणार निमगाव म्हाळुंगी) या पुरातील पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शोध पथकाला सापडला. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन सेवा पथक, शिक्रापूर पोलिसांची दोन पथके, आपदा मित्र पथक, दौलत शितोळे मित्र मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने तीन दिवस कामिनी ओढ्यात बुडालेल्या सूरजचा शोध सुरू होता. अखेर शोध पथकाला यश मिळाले असून सूरजचा मृतदेह शोध पथकाला सापडला आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे अधिकारी उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, उमेश फडके, शुभम पोटे, सिद्धांत जाधव, विकास आडे, राजेश फुंदे, दिग्विजय नलावडे तसेच दौलत शितोळे मित्र मंडळ, पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, संदीप कारंडे, संदीप इथापे, अमोल चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी गुलाब नवले, तलाठी आबासाहेब रुके, पोलिस पाटील किरण काळे, आपदाचे वैभव निकाळजे, महेश साबळे, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, राहुल गायकवाड आणि ग्रामस्थांच्या मदतीने सूरजचा मृतदेह काढण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल, मनीषा कटके, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आदींनी घटनास्थळी भेट दिली.
आपदा मित्र व अग्निशमन दलाने सूरज राजगुरुचा मृतदेह अथक प्रयत्नाने पाण्यातून बाहेर काढला असून, यासंदर्भात कैलास राजगुरू यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. शिक्रापूर येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार संदीप इथापे हे करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.