Ajit Pawar: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न का केला? बीडमध्ये काय घडलं?
esakal September 18, 2025 10:45 AM

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त बीडमध्ये आयोजित ध्वजारोहण आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान धक्कादायक घटना घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. यानंतर, रेल्वे उद्घाटनाच्या व्यासपीठावर बोलताना अजित पवारांनी बीडच्या नागरिकांना आत्मचिंतनाचा सल्ला देत सामाजिक समतेचा संदेश दिला.

आत्मदहनाचा प्रयत्न आणि तरुणांची मागणी

बीडमधील नगर नाका परिसरात ही गंभीर घटना घडली. अजित पवार ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी पोलीस ग्राऊंडकडे निघाले असताना, केज तालुक्यातील दोन तरुणांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमिततेची चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या समस्या, अजित पवार यांचा जनसंवाद कार्यक्रम; पाणीपुरवठा, कोंडीच्या तक्रारी अधिक बीड-अहिल्यानगर रेल्वेचा शुभारंभ

या घटनेनंतरही बीडते अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. उद्घाटनाच्या दिवशी रेल्वे प्रवास मोफत ठेवण्यात आला, परंतु अजित पवारांनी यावेळी बीडकरांच्या सवयींवर भाष्य करताना सांगितले, “आज उद्घाटनामुळे मोफत प्रवास आहे, पण उद्यापासून तिकीट काढावे लागेल. नाहीतर तुम्ही म्हणाल, त्या दिवशी फुकट होतं, आता का पैसे घेता?”

अजित पवारांचा बीडकरांना सल्ला

उद्घाटनाच्या व्यासपीठावर बोलताना अजित पवारांनी बीडच्या नागरिकांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला. “मी महाराष्ट्रभर फिरतो, पण तुम्ही नेत्यांना भेटलं की ‘वू’ असा आवाज करता. काय तुम्ही लोक? कधी सुधारणार? जग कुठे चाललंय, इतर देश-राज्ये कुठे आहेत, याचा विचार करा,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

“आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही. सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि समाजहितासाठी आम्ही कार्यरत आहोत. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री आमच्या पाठीशी आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याऐवजी माणुसकी आणि एकजुटीवर जोर दिला. “आपण माणूस आहोत, माणुसकी दाखवा. समाजात तेढ निर्माण करणं थांबवा. सर्वांना सोबत घेऊन प्रगती करायची आहे,” असे आवाहन त्यांनी केले.

Ajit Pawar: बीडकरांनो जरा चांगल्या सवयी लावा, कधी सुधारणार तुम्ही... अजित पवार व्यासपीठावर संतापले, नेमकं काय घडलं?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.