गावपाड्यांच्या विकासाचा निर्धार
जिल्ह्यात आदि कर्मयोगी उत्तरदायी कार्यक्रम सुरू
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर)ः केंद्र सरकारने धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत आदि कर्मयोगी उत्तरदायी शासन राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ११३ गावांमध्ये कार्यक्रम राबवला जाणार असून गावपाड्यांच्या विकासातून आदिवासींना आत्मनिर्भर करण्यासाठीचे प्रयत्न होणार आहेत.
या अभियानाअंर्तगत निवडलेल्या गावांमध्ये व्हिलेज ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी त्यांच्या गरजा ओळखून तयार केलेले विकास आराखडा शासनाकडे सादर केला जाणार आहे. तसेच महिला व बालकल्याण, ग्रामीण विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या १७ विभागांच्या २५ योजना आदिवासींपर्यंत पोहोचवणे, कार्यक्रमाचे मूळ उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किशन जावळे असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले सहअध्यक्ष, समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. तसेच तालुका स्तरावर गटविकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पेण येथील प्रकल्प अधिकारी आत्माराम धावे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांचा सक्रिय सहभाग आहे.
़़़़़़़-------------------------------------
समस्या निराकरणावर भर
शासकीय अधिकारी आदि कर्मयोगी म्हणून शिक्षक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेते काम करतील. आदिवासी समाजातील उत्साही तरुण आदि साथी म्हणून सहभागी होणार आहेत. गावांमध्ये आदि सेवा केंद्र सुरू केले जातील. या केंद्रांमार्फत आरोग्य, शिक्षण, पोषण, जल स्वच्छतेसारख्या सेवांबरोबर समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.
ः-----------------------------------------
११३ गावांची निवड
रायगड जिल्ह्यातील कर्जत (२४), पनवेल (१०), उरण (२), खालापूर (१०), पेण (२०), अलिबाग (१३), मुरूड (२), रोहा (९), सुधागड (२), माणगाव (२), तळा (१), श्रीवर्धन (३), म्हसळा (१) आणि महाड (२) तालुक्यांचा समावेश आहे.