गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वरळीमध्ये पार पडलेल्या विजयी मेळाव्यात वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले, त्यानंतर युतीच्या चर्चेनं जोर पकडला. दरम्यान त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे देखील शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी कौटुंबीक भेटीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये पहिल्यांदाच राजकीय बैठक पार पडली, या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत तसेच अनिल परब देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये महापालिका निरवडणुकीसंदर्भात वाटाघाटीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
दरम्यान आजा शिवसेना भवन येथे शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची बैठक उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली, या बैठकीमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
ठाकरे सेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक शिवसेना भवनामध्ये पार पडली, या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. मनसेसोबतच्या युतीचा निर्णय लवकरच घेऊ, मात्र तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा, असं उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे. भाजप नेते आणि मुख्यमंत्री आपल्यावरच टीका का करतायेत? हे लक्षात घ्या. निवडणुकीला फक्त शंभर दिवसच राहिले आहेत, त्यामुळे जोमानं कामाला लागा. विरोधकांना आपल्याला या निवडणुकीत गाडायचं आहे, जे आपल्याला सोडून गेले आहेत, ते परत पक्षात आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. भाजपनं आपला पक्ष आणि चिन्ह चोरलं आहे, असं या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.