राष्ट्रीय उद्यानात भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड राष्ट्रीय उद्यानात भारतीय प्रजातीच्या दुर्मीळ वृक्षांची लागवड
esakal September 18, 2025 09:45 PM

राष्ट्रीय उद्यानात भारतीय प्रजातीच्या दुर्मिळ वृक्षांची लागवड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज (ता. १७) ‘मुंबईचे फुप्फुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतीय प्रजातीच्या दुर्मिळ वृक्षांची लागवड करण्यात आली. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
भारत हा विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या वैविध्यपूर्ण भारतात वैविध्यतेची संकल्पना जैवविविधतेतून आली आहे. मूळ भारतीय प्रजातीचे प्रत्येक झाड कुठल्या न कुठल्या जैविक घटकाला अन्न, निवारा व आपली पुढची पिढी वाढविण्यासाठी हक्काची ठिकाणे देतात. म्हणून या वृक्षांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले.
आज लावलेल्या वृक्षांपैकी काही झाडे कीटक व फुलपाखरांना आधार, तर काही झाडे पक्ष्यांना, तर काही झाडे छोट्या प्राण्यांना आधार देणारी आहेत. ही रोपे झाडे होतील व त्या झाडांचे वृक्ष होतील. वन्यजीवांच्या अनेक पिढ्या या वृक्षांचे लाभार्थी असतील. अशा भावना या वेळी पालकमंत्री शेलार यांनी व्यक्त केल्या.

या वृक्षांची लागवड
या उपक्रमांतर्गत ७५ दुर्मिळ वृक्षांची लागवड केली. त्यामध्ये कारपा, हुम्ब, वटसोल, सफेद धूप, चांदकुडा, उपास, तांबडा कुडा, आंबेरी, तिरफळ, मिरची कंद, फणशी, कडवा शिरीड, गोरखचिंच, कुमकुम, चारोळी, नांद्रूक, खडक पायर, दातीर, नागकेशर, सप्तरंगी, रानजांभूळ, समुद्रशिंगी, शेरस, रानबिबा, काळा धूप, वारंग अशा अनेक दुर्मिळ व स्थानिक प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी दुर्मिळ अशी सह्याद्रीच्या स्थानिक प्रजातींची ७५ झाडे लावणे व जैवविविधता सांभाळणे, ही संकल्पना या वृक्षलागवडीमागे आहे.
आशीष शेलार, पालकमंत्री, मुंबई उपनगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.