देहू ते भंडारा डोंगर बससेवेस प्रारंभ
esakal September 19, 2025 12:45 AM

इंदोरी, ता. १८ ः श्री संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान (देहू) आणि तपोभूमी (भंडारा डोंगर) यांना जोडणारी पुणे परिवहन महामंडळाची नवीन बससेवा सुरू झाली आहे. या सेवेच्या माध्यमातून देहू आणि भंडारा डोंगर या दोन्ही पवित्र स्थळांना भेट देणे अधिक सोपे झाले आहे.
भंडारा डोंगर ही संत तुकाराम महाराज यांची साधनाभूमी असून, तेथे राज्यभरातून वारकरी संप्रदायिक भाविक दर्शनसाठी येत असतात. त्यांना देहूत आल्यानंतर खासगी वाहनाने किंवा चालत डोंगरावर जावे लागत होते. या सेवेमुळे देहूत आल्यानंतर किंवा डोंगराच्या पायथ्यापासून डोंगरावर जाण्यासाठी बसची सुविधा होणार आहे. देहू ते भंडारा डोंगर आणि भंडारा डोंगर ते देहू अशा दिवसातून सात फेऱ्या होणार आहेत. बुधवारी (ता. १७) भंडारा डोंगरावर या बससेवेचा प्रारंभ झाला. यावेळी माऊली दाभाडे, रवींद्र भेगडे, शांताराम कदम तसेच श्री क्षेत्र भंडारा डोगर समितीचे विश्वस्त, भाविक उपस्थित होते.
‘‘बससेवेच्या माध्यमातून भाविकांना भंडारा डोंगरावर येणे सोईचे होणार आहे. तसेच तुकोबारायांच्या तपोभूमीमधील वातावरणाचा आनंद घेता येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतिश गव्हाणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही सेवा सुरू झाली आहे,’’ असे माहिती भंडारा डोंगर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.