भोसरी : परतीच्या पावसाने भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. त्याने वाहनचालकांना पाठदुखीच्या त्रासाबरोबरच वाहनदुरुस्तीच्या खर्चालाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी न करता रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांमधून होत आहे.
पावसाळ्यात भोसरी, दिघी, इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवरील खड्डे पिंपरी चिंचवड महापालिकेने भरले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या परतीच्या पावसाने काही रस्त्यांवरील खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. काही ठिकाणी खड्ड्यांतील खडी रस्त्यांवर विखुरली असल्याने वाहने घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
खड्ड्यांतून सतत प्रवास केल्याने वाहन चालकांना पाठदुखीचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे खड्ड्यांत वाहने आदळून ती नादुरुस्तही होत आहेत. त्यामुळे दवाखान्यासह वाहन दुरुस्तीच्या खर्चाचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
तब्बल तीन फुटांचा खड्डा
भोसरीतील पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील एचडीएफसी बॅंकेजवळ तीन साडेतीन फूट खोल खड्डा पडला आहे. वाहन चालकाच्या निदर्शनास हा धोकादायक खड्डा येण्यासाठी काही नागरिकांनी त्यामध्ये लाकूड टाकून त्यावर पोते बसविले आहे. याकडे मात्र पालिका प्रशासन डोळेझाक करत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे रस्त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत. त्याने वाहनचालकाला अपघात होऊन जीaवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेने वाहनचालकांच्या जीवाशी न खेळता रस्त्याचे काम उत्कृष्टपणे केले पाहिजे.
- रामचंद्र पन्हाळे, वाहनचालक
इंद्रायणीनगर आणि भोसरी एमआयडीसीतील रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरूच आहे. पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे डांबरीकरणाने बुजविण्यात येणार आहेत.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
येत्या दोन दिवसांत भोसरी आणि दिघीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे इतर रस्त्यांची पाहणी करण्यात येईल. त्यावरीलही खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात येईल.
- शिवराज वाडकर, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय
कुठे आहेत खड्डे ?भोसरी : पुणे-नाशिक महामार्गावर लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार व एचडीएफसी बॅंकेसमोर, महामार्ग सेवा रस्ता संत ज्ञानेश्वर बॅंक्वेट हॉलसमोर, भोसरी गावठाण मारुती मंदिराजवळ, पीसीएमसी चौक, लांडेवाडी चौक
दिघी : सह्याद्री कॉलनी क्रमांक तीनसमोरील रस्ता, भारतमातानगर कॉलनी क्रमांक तीनकडून आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता, पालखी मार्गावरील विठ्ठल मंदिरासमोरील चौक, संत निरंकारी मंडळासमोरील रस्ता
इंद्रायणीनगर : श्री तिरुपती बालाजी चौक, इमारत क्रमांक ४७ व ४८ समोरील रस्ता, मोरया चौक
भोसरी एमआयडीसी : जे ब्लॉक प्लॉट क्रमांक ३८१ समोरील रस्ता, पेठ क्रमांक दहामधील जे-२४० मधील जय गणेश स्टील कंपनीसमोर
पुणे-नाशिक महामार्गावर लांडेवाडी चौकात पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्याने चर पडली आहे. भरधाव वेगात असलेल्या वाहनचालकांच्या निदर्शनास ती पटकन येत नसल्याने या चरीत वाहने आदळून पडत आहे. महापालिकेने ही चर तीन वेळा भरली आहे. मात्र, तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा चर उघडी पडली आहे.
- नरेश सुभेदार, वाहनचालक