मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल
esakal September 19, 2025 03:45 AM

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यातील फर्निचर आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी ४० लाखांपेक्षा जास्त खर्चाची निविदा जारी करण्यात आलीय. दोन वेगवेगळ्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. यात बेड मॅट्रेस, सोफा आणि इतर फर्निचर यासाठी २१ लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात दुरुस्तीसाठी ४० लाखांचा खर्च होणार असल्याच्या मुद्द्यावरून आता विरोधकांनी जोरदार टीका केलीय. राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना दुरुस्तीसाठी ४० लाख खर्च ही पैशाची उधळपट्टी म्हणायची की वाढलेली महागाई असा सवाल त्यांनी विचारला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षा बंगल्यासाठी निविदा काढली आहे. यामध्ये डबल बेड, मॅट्रेस आणि सोफा यासाठी कामाचा अंदाजे खर्च २० लाख ९७ हजार ९७३ रुपये आहे. ही निविदा १६ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, कंत्राटदारांना २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. निविदा २४ सप्टेंबरला उघडली जाईल. या खर्चावर काही नागरिक आणि विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डबल बेड मॅट्रेस आणि सोफ्यासाठी २० लाखाहून अधिक खर्च का? असा प्रश्न विचारला जात आहे.

Buldhana : आमदारांच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षीय तरुण गंभीर जखमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारवर कडाडून टीका केली आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात अतिवृष्टीने शेतकरी उध्वस्त झालेला असताना, सरकारकडे पैसे नसल्याने शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी दिली जात नसताना, राज्यावरील कर्जाचा बोझा ९.५ लाख कोटींच्या वर गेला असताना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय घरी म्हणजेच वर्षा निवासस्थानी double bed matress, सोफा यासाठी २०.४७ लाख रुपये तर किचन दुरुस्तीसाठी १९.५३ लाख असा एकूण ४० लाखाहून अधिक पैसा खर्च केला जात असेल तर यास जनतेच्या पैशाची उतमात म्हणावं की वाढलेली महागाई?

Shirdi : भाजप नेत्याच्या लेकानं रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, पोलीस मागे लागताच केलं अपहरणाचं नाटक; शेवटी अटक

मुख्यमंत्री यांना कदाचित हे माहित नसेल, पण हे असंच चालू राहिलं तर ‘रोम जळत आहे आणि निरो बासरी वाजवत आहे’ असाच त्याचा अर्थ निघेल... मंत्र्यांच्या घरांच्या दुरुस्तीची कामं केली पाहिजेत पण केंव्हा आणि त्यासाठी किती खर्च करावा याचाही ताळमेळ असला पाहिजे ना असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.