केरळमध्ये मेंदू खाणारा अमिबा (ब्रेन इटिंग अमिबा) पुन्हा चर्चेत आला आहे.
माध्यमांत आलेल्या विविध वृत्तांनुसार, सप्टेंबरच्या मध्यापर्यंत राज्यात या आजाराने ग्रस्त असे 60 हून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, केरळमधील विरोधी पक्ष यूडीएफने सरकारवर या आजाराच्या प्रसाराचे कोणतेही ठोस वैज्ञानिक स्पष्टीकरण देण्यात 'अपयश' आल्याचा आरोप केला आहे.
विधानसभेत आययूएमएलचे नेते एन. शमसुद्दीन म्हणाले की, हा आजार खूप वेगाने पसरत आहे.
त्याचे रुग्ण तिरुवनंतपुरम, कोल्लम, मलप्पूरम, त्रिशूर आणि पलक्कडसह अनेक जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहेत.
दरम्यान, केरळ सरकारने सार्वजनिक आरोग्याच्या या प्रकरणाची दखल अतिशय गांभीर्याने घेतल्याचं म्हटलं आहे.
वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर राजकीय आरोप-प्रत्यारोपडावे आमदार टी.आय. मधुसूदनन यांनी विरोधी पक्षांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. पिनराई विजयन सरकार सार्वजनिक आरोग्याला सर्वात जास्त महत्त्व देत असल्याचं त्यांनी ठामपणे म्हटलं आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, केरळच्या आरोग्य विभागाने अलीकडेच या आजाराबाबत विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
केरळमध्ये 2023 पासून मेंदू खाणाऱ्या अमिबाचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत.
नुकतंच केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाखालील यूडीएफ सरकारला जबाबदार धरलं होतं.
डेक्कन हेराल्ड या न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, आरोग्यमंत्र्यांनी डाव्या सरकारचा बचाव करताना त्यांनी संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी उपाय केले असल्याचं सांगितलं होतं.
त्यांनी मागील यूडीएफ सरकारवर संसर्गाशी संबंधित संशोधन अहवालावर काहीही काम केलं नसल्याचा आरोप केला.
परंतु, हा संशोधन अहवाल 2018 मध्ये प्रकाशित झाला होता, तेव्हा सीपीएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफ सरकार सत्तेवर होतं आणि के.के. शैलजा आरोग्यमंत्री होत्या. यावरून वीणा जॉर्ज यांच्यावरही टीका झाली आहे.
हा आजार नेमका काय आहे?वास्तविक या आजाराला प्रायमरी अमीबिक मेंनिंगोइन्सेफ्लायटिस (पीएएम) म्हणतात, जो नेग्लेरिया फॉलेरी अमिबामुळे होतो.
वास्तविक हा एक प्रकारचा दुर्मिळ मेंदू संसर्ग आहे. जास्त करून हे नाकाद्वारे होते, जेव्हा लोक स्विमिंग पूल किंवा तलावात पोहत असतात. नाकातून अमिबा शरीरात प्रवेश करून मेंदूच्या खाली असलेल्या क्रिब्रिफॉर्म प्लेटद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो.
बीबीसीचे सहकारी पत्रकार इमरान कुरेशी यांनी जुलै 2024 मध्ये या आजारातून वाचलेल्या 14 वर्षांच्या एका अल्पवयीन मुलाची बातमी केली होती.
त्यावेळी खास चर्चेदरम्यान, कोझिकोडमधील बेबी मेमोरियल हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पीडियाट्रिक्स इंटेन्सिव्हिस्ट (सल्लागार बालरोग तज्ज्ञ) डॉ. अब्दुल रऊफ यांनी सांगितलं की, "हा एक परजीवी आहे, जो वेगवेगळे रासायनिक पदार्थ सोडतो आणि मेंदू नष्ट करतो."
याची मुख्य लक्षणे म्हणजे, ताप, तीव्र डोकेदुखी, घसा खवखवणे, बेशुद्ध पडणे, फेफरे किंवा झटके येणे आणि कोमात जाणे. डोक्यावर खूप दाब आल्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो.
डॉ. रऊफ म्हणाले, "हा अमिबा ताज्या पाण्याच्या तलावात आढळतो, विशेषतः उष्णकटिबंधीय तलावात. लोकांनी पाण्यात उडी मारू नये किंवा त्यात डुंबू नये, कारण याच मार्गे अमिबा शरीरात प्रवेश करतो."
"जर पाणी दूषित असेल, तर अमिबा नाका मार्गे शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे दूषित तलाव किंवा स्विमिंग पूलपासून दूर राहावं, किंवा पाण्यात पोहताना तोंड पाण्याबाहेर ठेवावं. पाण्यात क्लोरीन टाकणं खूप महत्वाचं आहे."
परंतु, कर्नाटकच्या मंगळुरू येथील कस्तूरबा मेडिकल कॉलेजने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात नवजातांमध्ये एन. फॉलेरी अमिबा संसर्गाची प्रकरणंही दिसून आली आहेत, जी पाण्याच्या स्रोतांमुळे झाली. येथे वापरलं जाणारं आंघोळीसाठीचं पाणीही आजाराचा स्रोत ठरले.
या आजारात मृत्यू दर सुमारे 97 टक्के इतका आहे. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने (सीडीसी) प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, 1971 ते 2023 दरम्यान या घातक आजाराने ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मेक्सिको आणि पाकिस्तानसह चार देशांमध्ये संक्रमित केलेल्या लोकांपैकी फक्त आठ लोक जिवंत राहले.
या लोकांना या आजाराची लागण झाले हे त्यांना 9 तासांपासून ते 5 दिवसांच्या आत लक्षात आल्यानेच त्यांचा जीव बचावला गेला होता.
अमेरिकेच्या सीडीसीनुसार, एप्रिल 2024 मध्ये त्यांच्या पाकिस्तानमधील एका टीमच्या संशोधनानुसार, या आजारातून वाचलेले लोक साधारणपणे 9 ते 25 वर्षे वयाचे आहेत.
यावर उपचार काय आहे?सुरुवातीलाच हा आजार लक्षात आला किंवा त्याचे निदान झाले तर रुग्णावर उपचार करणं सोपं जातं आणि त्याला वाचवता येतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
या आजारात डॉक्टर सहसा लक्षणं दिसू लागल्यानंतर 24 तासांच्या आत लंबार ट्रीटमेंट आणि अँटी मायक्रोबिल औषधांचा एकत्रित वापर करतात (जसं की अँफोटेरिसिन बी, रिफॅम्पिन आणि अॅझिथ्रोमायसिन).
डॉ. रऊफ सांगतात की, रुग्णाच्या सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडमध्ये (सीएसएफ) एन. फॉलेरी शोधण्यासाठी पीसीआर (पॉलीमरेझ चेन रिअॅक्शन) चाचणी केली जाते.
ते म्हणतात की, रुग्णाला मिल्टेफोसिन औषध दिलं जाऊ शकतं, जे पूर्वी मिळवणं खूप कठीण होतं. जेव्हा असे रुग्ण समोर आले, तेव्हा सरकारने हे जर्मनीतून आणले. भारतात या औषधाचा वापर दुर्मिळ आजारांमध्ये होतो, पण हे फार महागही नाही.
रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवताना सुद्धा अनेक प्रकरणांमध्ये पुढील एक महिन्यापर्यंत त्याची औषधं सुरूच ठेवली जातात.
या आजाराचा सर्वोत्तम उपचार म्हणजे खबरदारी घेणं, दूषित पाण्याचे तलाव, विहिरी आणि स्विमिंग पूलमध्ये पोहायला जाणं टाळावं, असं डॉक्टर सांगतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.