वडगाव मावळ, ता. १८ : शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात व कृषी अधिकारी संताजी जाधव यांनी केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने ७५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे आणि साहित्य खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये पाच अश्वशक्ती क्षमतेचा ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच, ९० मी.मी.पीव्हीसी पाइप, बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप, ताडपत्री या वस्तू खरेदी करता येणार आहेत. या योजनेद्वारे शेती उपयोगी तसेच जोड व्यवसायासाठी वस्तूंवर अनुदान दिले जाते. त्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरण (डीबीटी) योजनेद्वारे बँकेत जमा केले जाते. शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाइलवरून अथवा गावातील सुविधा केंद्रातून https://zppunecessyojana.com/ या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे
फोटो, आधार कार्ड, सातबारा उतारा, आठ-अ दाखला, रेशन कार्ड, छोटे कुटुंब प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला, स्वयंघोषणापत्र, बॅंक पासबूक
*जास्तीत जास्त दहा एकरांपर्यंत शेती असावी.
*पीव्हीसी पाइपसाठी पाणी परवाना अथवा सात-बारावर विहिरीची/शेततळ्याची/बोरवेलची नोंद असलेली प्रत अपलोड करावी.
*मोटार पंप संचासाठी अर्जदाराने सिंचन सुविधेची नोंद, वीजबिल जोडावे.
जिल्हा परिषदेच्या या योजनामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी आणि शेतीसाठी लागणारी मूलभूत साधने कमी खर्चात मिळणार आहेत.
- कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी
ही योजना पूर्णपणे ऑनलाइन आहे. यामुळे अधिक पारदर्शकता आणि गरजू लाभार्थ्यांना योजनांचा फायदा होण्यास मदत होईल. सर्वांना समान संधी मिळेल. ही योजना केवळ शेतकरी हिताची नसून उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाची आहे.
- संताजी जाधव, कृषि अधिकारी