(आज जागतिक बांबू दिन आहे. नागपूरमध्ये आज ज्या ठिकाणी बांबूचे घनदाट जंगल आहे त्या ठिकाणी कधी राखेनी माखलेली जमीन होती यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. ही गोष्ट कशी घडली? हे सांगणारा हा विशेष लेख)
सगळीकडे विषारी, घातक घटक असलेली फ्लाय अॅश पसरलेली होती. त्यामुळे परिसरात सर्वत्र धूळ जमा व्हायची. पण, आता या पूर्णपणे मृत झालेल्या आणि वर्षानुवर्ष राखेचे अनेक थर साचलेल्या जमिनीवर हिरवगार बांबूचं जंगल उभं राहिलंय.
हे शक्य झालं ते नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे NEERI चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लाल सिंग आणि त्यांचे सहकारी, NEERI चे विद्यार्थी आणि बचत गटातील महिला यांच्या प्रयत्नामुळे.
आधी या परिसरात राखेनी माखलेली जमीन होती. पण आता NEERI तील या प्रयोगामुळे नागपुरात बांबूचे जंगल तयार झाले. या जंगलामुळे ती राख उडून होणारा उपद्रव तर कमी झालाच पण याचसोबत महिलांसाठी रोजगाराचे साधन देखील त्यांनी उपलब्ध करुन दिले आहे.
त्यांनी या राखेनं भरलेल्या जमिनीवर घनदाट बांबूचं जंगल कसं उभारलं? त्यासाठी त्यांनी कोणतं तंत्रज्ञान वापरलं? पाहुयात.
पण, याआधी फ्लाय अॅश म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊयात.
फ्लाय अॅश म्हणजे काय?आपल्या घरात वीज आली म्हणून अनेक सुख-सोयी मिळतात. ही वीज कोळशापासून तयार केली जाते तेव्हा कोळसा जळून त्यामधून फ्लाय अॅश म्हणजेच राख तयार होते.
या राखेत अनेक घातक रसायनं असतात ज्यामुळे पर्यावरणाचं तर नुकसान होतंच. पण, आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात.
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या या राखेत आर्सेनिक, कॅडमियम आणि मर्क्युरीसारखे धोकादायक हेवी मेटल्स असतात.
हीच राख आजूबाजूच्या वातावरणात पसरते तेव्हा श्वसनावाटे हे घातक धुलीकण शरीरात जातात. या हेवी मेटल्स आणि अशा धुळीच्या वातावरणात जास्त काळ राहिल्यास सिलिकॉसिस, फायब्रॉसिस, ब्राँयकायटिस असे श्वसनाचे आजार होत असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
या राखेचा वापर सिमेंट उद्योग, रस्ते बांधकामांमध्ये होतो. पण, NEERIच्या आकडेवारीनुसार तब्बल 37 टक्के राख कुठेही न वापरता वातावरणात पडलेली असते.
हीच साचलेली राख वातावरणात इतरत्र उडू नये, राखेनं माखलेली जमीन पुन्हा जीवंत व्हावी यासाठी नागपुरातील डॉ. लाल सिंग आणि त्यांच्या टीमने प्रयत्न सुरू केले.
त्यांनी 2016 साली या राखेनं भरलेल्या जमिनीवर काम करायला सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नामधून आता हिरवेगार जंगल तयार झालंय.
राखेवर कोणती झाडे जगू शकतात?राखेत आर्सेनिक, अॅल्युमिनियम, कॅडमियम यासारखे हेवी मेटल्स आणि घातक रसायनं असतात. तसेच राखेत झाडांना बांधून ठेवण्यासाठी कुठलेच सेंद्रीय घटक नसतात.
त्यामुळे यावर झाडं सहज उगवतील का? हा प्रश्न होता. कारण अशा राखेवर झाड जगवणं हे कठीण काम असतं. त्यावर डॉ. सिंग यांनी उपाय शोधून काढला.
त्यांनी ईआरटी म्हणजे इको रिज्युव्हीनेशन टेक्नॉलॉजी तयार करून विषारी राखेचे थर साचलेल्या मृत जमिनीवर जंगल उभारलं. डॉ. सिंग तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर सांगतात.
ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "राखेनं माखलेल्या जमिनीवर बांबू लावण्याआधी आम्ही फ्लाय अॅशचं वैशिष्ट्य समजून घेतलं. त्यामध्ये ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक कुठले घटक आहेत याचा अभ्यास केला.
"फ्लाय अॅशमध्ये कुठलेही ऑर्गेनिक म्हणजेच सेंद्रीय घटक नसतात. त्या जमिनीच्या फिजिकल, केमिकल आणि मायक्रोबायोलॉजिकल गोष्टींचा लॅबोरेटरीमध्ये अभ्यास केला.
"यामध्ये कोणत्या प्रकारचं झाडं जगू शकते हे शोधून काढलं. त्यानुसार आम्ही झाडाची निवड केली. या झाडांना जगवण्यासाठी, चांगली वाढ होण्यासाठी कुठल्या सेंद्रीय घटकाची गरज आहे याचा सुद्धा अभ्यास केला. त्यानुसार खड्डे तयार केले.
"पण, राख लूज मटेरियल असल्यानं खड्डा केला की तो लगेच बुजून जायचा. तसेच राखेत पाय सुद्धा अडकायचे. त्यामध्ये ऊसावर प्रक्रिया केल्यानंतर जो टाकाऊ पदार्थ उरतो ज्याला प्रेस मड म्हणतात त्याचा वापर या खड्ड्यांमध्ये केला. त्यामध्ये आम्ही बांबूची झाडं लावली. या तंत्रज्ञानामध्ये झाडांच्या प्रकाराची निवड करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे."
राखेचं मातीत रूपांतर व्हायला सुरुवातडॉ. सिंग यांनी नागपुरातील कोराडी थर्मल पॉवर प्लांटच्या राखेनं भरलेल्या 230 एकर जमिनीवर हे बांबूचं जंगल उभं केलंय. प्रत्येकी दहा एकरांचे 23 प्लॉट्स आहेत.
त्यामध्ये त्यांनी ही बांबू लागवड केली आहे. राखेमुळे पसरणारी धूळ रोखणे आणि जमिनीला पुन्हा जीवंत करणे हाच यामागचा उद्देश असल्याचं ते सांगतात.
इतक्या झाडांपैकी त्यांनी बांबूची निवड का केली? याबद्दल त्यांनी शास्त्रीय कारण सांगितलं.
बांबू कमी वेळेत उंच वाढतो आणि बांबूला लहान लहान खूप सारी पानं असतात. तसेच बांबूची मुळं दूरपर्यंत पसरतात. तसेच बांबूच्या पानांमध्ये 25 टक्के सिलिका असते. त्यामुळे जमिनीवर जमा झालेली राख आणि पॉवर प्लांटकडून येणारी धूळ रोखण्याचं काम बांबू करतो. बांबूच्या पानांवर ही धूळ जमा झाली तरी पानांची संख्या जास्त असल्यानं त्यावर परिणाम होत नाही, असंही डॉ. सिंग सांगतात.
आता कोराडी पॉवर प्लांटच्या ज्या भागात त्यांनी असं जंगल उभारलं तिथं सध्या तरी धूळ दिसली नाही. तसेच विषारी राखेवर कधीही न दिसणाऱ्या कीडे-मुंग्या सुद्धा आता जंगल तयार झाल्यानं तिथं दिसू लागल्या आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी विकसित केलेल्या या ईआरटी तंत्रज्ञानामुळे राखेचं मातीत रूपांतर व्हायला सुरुवातही झाली आहे.
डॉ. सिंग सांगतात, "अशा निर्जीव झालेल्या जमिनीत पूर्ववत व्हायला जवळपास 10 वर्षं लागतात. आता आमच्या प्रयोगाला आठ वर्षं पूर्ण होत आहेत. आम्ही चाचण्या केल्या या राखेच्या जमिनीचा वरचा काही भाग मातीत रुपांतर होत आहे. पण पूर्णपणे मातीत रुपांतर होण्यासाठी आणखी काही काळ जाऊ द्यावा लागेल."
महिलांना दिला रोजगारअशा निर्जीव जमिनीवर झाडं लावण्यासाठी निरी आणि कोराडी थर्मल पॉवर प्लांटने परिसरातल्या बचत गटाच्या महिलांची मदत घेतली.
त्यांनी झाड लावण्यापासून तर आता या जंगलाची देखरेख करण्यापर्यंत सगळी कामं या महिला करतात.
इथल्या एका साईटवर काम करणाऱ्या महादुला इथल्या प्रणाली सहारे सांगतात, "इथं आधी सगळी राख जमा झाली होती. ही राख या परिसरात उडायची. आम्ही झाडांसाठी खड्डे खोदत होतो तेव्हा पाय खोलात जायचे. पण, आम्ही झाडं लावली. आता याच झाडांची आम्ही दररोज काळजी घेतो. इथं झालेल्या कचरा काढतो. झाडांना पाणी घालतो.
पण, या महिलांना दिवसाचे फक्त पाच हजार रुपये मिळतात. ते आता वाढवून देण्याची मागणी सुद्धा त्यांनी थर्मल पॉवर कंपनीकडे केली आहे.
जमिनींच्या ऱ्हासावर उपाय काय?डॉ. सिंग फक्त प्लाय अॅश नाहीतर घातक कचरा, नैसर्गिक संसाधनाच्या अतिवापरामुळे नापीक झालेल्या जमिनी, मातीची धूप झाल्यानं गुणवत्ताहीन झालेली जमिनींना जीवंत करण्याचं काम करतात.
पर्यावरण मंत्रालयाच्या एका रिपोर्टनुसार आपल्या देशात एकूण 97.85 मिलियन हेक्टर जमिनीचा ऱ्हास झाला आहे.
यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर दिसतोय. यापैकी देशातील 1500 एकर जमिनींना जीवंत करण्याचं काम डॉ. सिंग यांनी केलंय.
त्यांनी चंद्रपूर औष्णिक वीज प्रकल्पाची राखेनं भरलेली जमीन, भंडारा इथल्या मॅग्नीज खाणीची मृत झालेली जमीन, खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्प, ओडिशातील प्रकल्प अशा काही जमिनींवर बांबूची झाडं लावून या जमिनींना जीवंत करण्याचं काम ते करत आहेत. या तंत्राचा वापर केल्यास जमिनीचा ऱ्हास थांबवता येऊ शकतो असं ते सांगतात.
मृत झालेल्या जमिनींना पुन्हा त्यांच्या मूळ स्वरुपात परत आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)