पिंपरी : पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी या केंद्राचा कालावधी संपला होता. मात्र, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत नागरिकांना सुविधा अखंडित मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्पुरती मुदतवाढ मंजूर केली आहे.
नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांना रहिवासी दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, विद्यार्थी दाखला अशा शैक्षणिक आणि शासकीय कामांसाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे मिळतात. दरवर्षी शालेय व महाविद्यालयीन प्रवेशाच्या कालावधीत या कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर मागणी होते.
त्यामुळे जून-जुलै महिन्यांत तहसील कार्यालयात नागरिकांची गर्दी उसळते. तहसील कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, शालेय प्रवेशाच्या हंगामात नागरी सुविधा केंद्रामार्फत दिवसाकाठी सरासरी ४०० प्रमाणपत्रे वाटप केली जातात, तर इतर काळात ही संख्या सुमारे २५० इतकी असते. या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मागणीमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी मुदत संपूनही केंद्राच्या सेवेत खंड पडू नये, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
नागरी सुविधा केंद्रासाठी नवीन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. तोपर्यंत सध्याच्या केंद्राला मुदतवाढ दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड