हायलॅण्ड नवरात्रोत्सवात सोमनाथ मंदिराची प्रतिकृती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : यशस्वीनगर-हायलॅण्ड सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच नवरात्रोत्सव साजरा केला जाणार असून, मंडळातर्फे गुजरातेतील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराची ३५ फूट उंच प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उत्सवाच्या परिसरात आकर्षक रोषणाई, दररोज नवचंडी यज्ञासह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील, अशी माहिती भाजपाचे आमदार व मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजय केळकर यांनी दिली. या वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश पाटील यांचीही उपस्थिती होती. नाशिक येथील प्रसिद्ध वे. शा. सं. मुकुंदशास्त्री मुळे यांच्या हस्ते देवीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. तसेच दररोज नवचंडी यज्ञ केला जाईल. दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, धार्मिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ्यांची उपस्थिती असेल. रात्री आठनंतर रास गरबा भरविला जाईल, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त यशस्वीनगर, हायलॅण्ड, ढोकाळी परिसरातील नागरिकांच्या वतीने यंदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून नीलेश पाटील यांची निवड झाली. त्यानंतर हायलॅण्ड सोसायटीलगतच्या मैदानात यंदा प्रथमच भव्य स्वरूपात सार्वजनिक नवरात्रोत्सव भरविला जाणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या या नवरात्रोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध नेते, मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मंडळाने पहिल्याच वर्षी भव्य देखावा साकारण्याचे ठरविले असून, गुजरातेतील सोमनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. यंदा त्रिशताब्दी वर्ष सुरू असून, या देखाव्यातून अहिल्यादेवींच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाईल. पुण्यातील दगडूशेठ हलवाई, मुंबईतील फोर्टचा राजा मंडळाच्या गणेशोत्सवातील कला दिग्दर्शक ओमकार गुरव यांच्याकडून देखावा साकारला जात आहे. या उत्सवानिमित्त संपूर्ण यशस्वीनगर, ढोकाळी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाईल. तसेच भव्य झुंबर व स्वागत कमान उभारली जाईल.