नमो उद्यानासाठी नगरपरिषदांना निधी
esakal September 19, 2025 10:45 AM

आळंदी, ता. १८ : उद्यानासाठीच्या आरक्षित जागांमध्ये उत्कृष्ट उद्यान विकसित करून नागरिकांना चांगल्या दर्जाची उद्याने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने शासनाने आळंदीसह सासवड, जेजुरी, इंदापूर, राजगुरुनगर, भोर, जुन्नर, शिरूर या आठ नगरपरिषदेस प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उद्यान विकसित करण्यासाठी दिला आहे. हा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकासासाठी दिला आहे.
याबाबतचा शासन निर्णय नगर विकास विभागाने बुधवारी (ता. १७) काढला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यातील नगरपंचायतींना तसेच नगरपरिषदांना कामासाठी विशेष अनुदान म्हणून निधी दिला जातो. नगरपरिषद स्तरावरती शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती तसेच नव्याने विकसित करण्याकरता निधीची उपलब्धता सुलभ व्हावी यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने राज्यभरातील नगरपरिषदांना निधी उपलब्ध करून दिला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नमो उद्यान विकसित करण्यासाठी हा निधी दिला आहे.
विकसित केलेल्या उद्यानांची विभागवार स्पर्धा शासनाच्या वतीने आयोजित केली आहे. या स्पर्धेतून प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत तीन उद्यानांची निवड होणार आहे. प्रथम आलेल्या नमो उद्यानाचा मान मिळवणाऱ्या नगरपरिषदेस पाच कोटींचा निधी तर दुसरा आणि तिसरा नंबर मिळवणाऱ्या नगरपरिषदेस अनुक्रमे तीन आणि दोन कोटींचा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यात कोणती नगरपरिषद चांगले उद्यान विकसित करणार हे आता नागरिक पाहणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.