वडगाव मावळ, ता. १८ : येथील जय बजरंग तालीम ट्रस्टच्या वतीने स्व. पै. केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ बैलपोळा सणानिमित्त रविवारी (ता. २१) शेतकरी बांधवांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संयोजक उमेश ढोरे यांनी दिली. बैलपोळा हा सण शेती संस्कृतीचा आत्मा मानला जातो. शेतकऱ्याचा खरा सखा असलेल्या बैलांच्या परिश्रमांची आठवण करून देणारा, त्याच्या कार्याची कृतज्ञतेने आठवण ठेवणारा हा सण दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, वडगाव येथे जय बजरंग तालीम ट्रस्टच्या वतीने रविवारी (ता. २१) दुपारी तीन वाजता चावडी चौकात बळीराजाचा सन्मान सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात वडगाव तसेच परिसरातील अनेक शेतकरी बांधवांना सन्मानित करण्यात येणार असून, त्यांच शेतीमधील योगदान, बैलांची निगा राखण्यातील मेहनत आणि पारंपरिक कृषी संस्कृतीच्या जपणुकीसाठी त्यांची बांधीलकी लक्षात घेऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे.
---