Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले
esakal September 19, 2025 02:45 PM

पुणे - शहरातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असताना महापालिका प्रशासनाने आज (ता. १९) औंध बाणेर, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जोरदार अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ७० हजार चौरस फुटावरील अतिक्रमण काढण्यात आले. यात ९८ शेड, दुकाने काढून टाकण्यात आले आहेत.

आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती देण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी शहरात जोरदार पाऊस पडत असतानाही अतिक्रमण, बांधकाम विभागाने संयुक्तपणे कारवाई केली.

औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन तसेच भाऊ पाटील रस्ता, हॅरिस पूल परिसरातील अनधिकृत बांधकामे, शेडवर हातोडा चालवण्यात आला. या कारवाईत सुमारे ९८ शेड, दुकाने, हॉटेल व कच्ची-पक्की बांधकामे पाडण्यात आली. तंबू, लोखंडी जाळ्या, फर्निचर, काउंटर इत्यादी साहित्य जप्त करत तब्बल ६७ हजार ३६५ चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील कात्रज चौक परिसरातही मोठी कारवाई झाली. उपायुक्त संदीप खलाटे, परिमंडळ उपायुक्त विजयकुमार थोरात व सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २५०० चौरस फूट अतिक्रमण हटवून पाच ट्रक साहित्य जप्त केले.

दरम्यान, मंगळवार व बुधवारी शहरातील प्रमुख रस्ते व पदपथांवरील ३१ हजार ७०० चौरस फूट अतिक्रमणे काढण्यात आली. या मोहिमेत १३ हातगाड्या, ४१ पथाऱ्या, १० गॅस सिलिंडर, ८८ झोपड्या आणि ८३ अन्य अनधिकृत दुकानांवर कारवाई झाली.

महापालिकेकडे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर आलेल्या तक्रारींनंतर ही कारवाई करण्यात आली असून, पुढील काळात अशा मोहिमा सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त खलाटे यांनी सांगितले.

अतिक्रमण पुन्हा जैसे थे

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी धायरी गाव, उंबऱ्या गणपतीच्या परिसरात मोठी अतिक्रमण करवाई करण्यात आली होती. त्यामध्ये दुकाना पुढील शेड, भर चौकातील वडापाव व अन्य वस्तू विक्रीच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली होती. पण ही कारवाई झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा उंबऱ्या गणपती चौकात अतिक्रमणे थाटली आहेत. त्यामुळे कारवाई करून काहीही फरक पडलेला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.