भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका करत असलेल्या पदभरतीची उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सुमारे ३५८ पदांची भरती केली जाणार असून त्यासाठी तब्बल १२ हजार ९७१ उमेदवारी अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज आलेल्यांसाठी लवकरच लेखी परीक्षेची तारीख जाहीर केली जाणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेत एक हजार ७८ पदे रिक्त आहेत. राज्य सरकारकडून ही पदे भरण्याच्या सूचना आल्यानंतर ३५८ पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यात कनिष्ठ अभियंता, लिपिक, सर्व्हेअर, स्वच्छता निरीक्षक, चालक, उद्यान अधिक्षक, अग्निशामक, बालवाडी शिक्षिका, प्रसविका, प्लंबर आदींचा समवेश आहे. वास्तविक फेब्रूवारी २०२३ मध्येच पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे ती रखडली होती. त्यानंतर यावर्षी ऑगस्टमध्ये प्रशासनाने प्रत्यक्ष भरतीची प्रक्रिया सुरू केली. टीसीएस या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. आता पुढील प्रक्रिया म्हणून उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली.