तळेगाव ढमढेरे - निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) गावात परिसरातील विविध वाडी - वस्तीवर सात ते आठ बिबट्यांनी एकत्रित धुमाकूळ घातला आहे. येथील शेतकरी पंढरीनाथ चव्हाण यांच्या शेतामध्ये व घराजवळ सात ते आठ बिबट्यांचा मेंढरांसारखा कळप दिसून आला आहे. हे सर्व बिबटे एकत्रित फिरत आहेत. बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी रात्री एका शेतकऱ्याला रस्त्याने जाताना पंढरीनाथ चव्हाण यांच्या घराजवळ व शेताजवळ सात ते आठ बिबटे दिसले. त्यांनी अंधारात सदर बिबट्यांचा व्हिडिओ काढला आणि तो समाज माध्यमावरील ग्रुप वर टाकला. वाऱ्यासारखा वेगात हा व्हिडिओ ग्रुपवर सर्वत्र प्रसिद्ध झाला.
गावात एका वेळेस इतके बिबटे पाहून घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने त्वरित परिसराची पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी रावसाहेब चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, गावातील बिबट्यांचा वावर पाहता ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाला पत्र व्यवहार केला असल्याचे सरपंच सचिन चव्हाण व पोलीस पाटील किरण काळे यांनी सांगितले.
दरम्यान, टाकळी भिमा (ता. शिरूर) येथे तळेगाव ढमढेरे रस्त्याजवळ बाळासाहेब ढमढेरे यांच्या शेतात काल सकाळी बिबट्याचे दर्शन झाले असून, सोमनाथ चव्हाण यांच्या दुचाकी गाडीचा बिबट्याने पाठलाग केला. श्री चव्हाण यांनी वेगात गाडी नेल्याने ते बचावले आहेत. नागरिकांनी खबरदारी घ्यावी व बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण करावे असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील वडघुले व पोलीस पाटील प्रकाश करपे यांनी केले आहे.
शासनाच्या वनविभागातर्फे बिबट परिसरात सावधानतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी सुरक्षितता राखण्यासाठी पुढील प्रतिबंध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कधीही बिबट्याचा पाठलाग करू नये, लहान मुलांची पालकांनी काळजी घ्यावी, मुलांना एकटे सोडू नये, बिबट्या दिसल्यास जोरात आरडाओरडा करावा, रात्री उघड्यावर झोपू नये, बिबट्याला जखमी करू नये कारण जखमी बिबट्या अती धोकादायक असतो, बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा :- ९६९९२००५५३ (वनपरिक्षेत्र अधिकारी).