केडगाव, ता. १९ : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. २०) केडगाव (ता. दौंड) येथे आयोजित केली आहे. बाजार समितीचे सभापती गणेश जगदाळे सभेच्या अध्यक्षस्थानी असतील. केडगाव मार्केटयार्डमध्ये सकाळी ११ वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर ११.३० वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला आमदार राहुल कुल हे मार्गदर्शन करतील. या शेतकरी मेळाव्यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांना सुभाष कुल कृषीभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी आमदार कुल यांच्या हस्ते डाळिंब व कांदा शेडचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती संचालक अशोक फरगडे यांनी दिली.