नागपूर : जिल्हा परिषदेसाठी लागू करण्यात आलेल्या झिरो आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावल्या. त्यामुळे मुदतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
याचिकाकर्त्याने सर्कलनिहाय चक्राकार पद्धत लागू करण्यात आलेले आरक्षणाचे वर्तुळ अद्याप पूर्ण झाले नसल्याने राज्य शासनाच्या झिरो आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले होते. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळून लावली आहे.
त्यामुळे या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपला आहे. त्यामुळे दिग्गज पुढाऱ्यांसह अनेक नवख्या तरुणांनी गुढघ्याला बाशिंग बांधून ठेवलेले आहे. न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
अध्यक्षपद ओबीसींसाठी आरक्षित
राज्य शासनाने काढलेल्या आरक्षण सोडतीनुसार नागपूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आलं आहे.
यामुळे आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.
अडीच वर्षांसाठी हे आरक्षण राहणार आहे.
त्याप्रमाणे पंचायत समितीचे सभापतीपदाचेही आरक्षण काढण्यात आले असून जिल्ह्यात १३ पंचायत समित्यांत आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यामुळे राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सक्रिय झाल्याचे दिसून येते.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांबाबत राज्य सरकारचे नवे आरक्षण न्यायालयाने योग्य ठरवल्याने न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला असून निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात.
- मनोहर कुंभारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष
आपणच नियम लागू करायचा आणि आपल्याच माणसाला न्यायालयात आव्हान द्यायला लावायचे, असा खेळ या सरकारचा चालू आहे. परंतु न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. रखडलेल्या जि.प. व पं.स. निवडणुका लवकरात लवकर होतील ही अपेक्षा आहे.
- अतुल पेठे, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस (एसपी) नरखेड
न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य करून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ. भाजप ज्या पद्धतीनेही आरक्षण येईल त्या प्रमाणे निवडणुका समोर जाईल. आमच्या सरकारने जे लोकहिताचे काम केले आहेत त्यानुसार आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमचाच विजय होणार हा विश्वास आहे.
- आनंदराव राऊत पाटील, जिल्हाध्यक्ष भाजप
नविन रचनेमुळे नविन चेहऱ्यांना संधी मिळणे सोयीस्कर झाले.यात नव्याने तरुण तरूणींना प्राधान्य मिळू शकते. ज्यांचे सर्कल १० वर्षांपासून राखीव होते त्यांना दिलासा आणि ज्यांचे राखीव नव्हते त्यांनाही नविन उमेद असणार मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात येणारे प्रशासन जनतेला अगदी स्वच्छ व सुलभ पाहायला मिळेल.
- मयुर उमरकर, माजी सदस्य पं.स. नरखेड